नवी दिल्ली: मागील पाच वर्षांत राष्ट्रीय सुरक्षा गार्ड (NSG), केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (CAPF), आणि आसाम रायफलचे ५५,५५५ जवान विविध कारणांनी सेवेतून बाहेर पडले आहेत. यामध्ये ४७,८९१ जवानांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली असून ७,६६४ जवानांनी राजीनामा दिला आहे. त्याचप्रमाणे, ७३० जवानांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी राज्यसभेत खासदार मुकुल वासनिक यांना दिलेल्या लेखी उत्तराद्वारे ही माहिती उघड केली.
सेवेतील ताणतणावाचे मुख्य कारणे
सततच्या तणावपूर्ण सेवा, कुटुंबापासून दूर राहणे, अपुरी विश्रांती, कमी पगार, आणि सेवेतली असुरक्षितता ही जवानांच्या स्वेच्छानिवृत्ती आणि आत्महत्यांचे संभाव्य कारणे मानली जात आहेत.
मानसिक ताणाचा वाढता परिणाम
जवानांच्या मानसिक तणावावर त्वरित उपाय करण्याची आवश्यकता आहे. तणाव दूर करण्यासाठी मानसिक आरोग्य सल्लागार नेमणे, कुटुंबीयांसोबत अधिक वेळ घालवण्यासाठी विशेष सवलती, सुट्ट्या, आणि वेतनवाढ यासारख्या उपायांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.
राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका
देशाच्या सुरक्षेसाठी जीवाची बाजी लावणाऱ्या जवानांच्या समस्यांकडे सरकारने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. जवानांच्या समस्या सोडवण्यात उशीर झाल्यास, याचा राष्ट्रीय सुरक्षेवर गंभीर परिणाम होऊ शकतो.
सरकारकडून या मुद्द्यांवर तत्काळ लक्ष देणे अपेक्षित आहे, जेणेकरून जवानांचा आत्मविश्वास वाढेल आणि देशाच्या सुरक्षा व्यवस्थेत स्थिरता येईल.