
राज्यात इयत्ता पहिलीपासून हिंदी सक्तीविरोधात मनसेने घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर राज्य सरकारने अखेर एक पाऊल मागे टाकत तिसऱ्या भाषेच्या सक्तीचा निर्णय मागे घेतला आहे. मात्र, मनसेने याच निर्णयाच्या पार्श्वभूमीवर ५ जुलै रोजी वरळीत विजयी मेळावा आयोजित केला असून, यामध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षही सहभागी होणार आहे. दोन ठाकरे एकत्र येणार, अशी चर्चा सुरू असतानाच याप्रकरणाला एक नवीन कलाटणी मिळाली आहे.
शेअर बाजारातील प्रसिद्ध गुंतवणूकदार आणि ‘केडियानॉमिक्स’चे प्रमुख सुशील केडिया यांनी सोशल मीडियावरून थेट राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. “राज ठाकरे, लक्षात ठेवा, मी गेल्या ३० वर्षांपासून मुंबईत राहतो, तरीसुद्धा मला मराठी नीट येत नाही. आता तुमच्या वाईट वागणुकीमुळे मी असा निश्चय करतो की, जोपर्यंत तुमच्यासारख्या लोकांना मराठी माणसांची काळजी घेण्याचं नाटक करण्याची मुभा आहे, तोपर्यंत मी मराठी शिकणार नाही. मी अशी प्रतिज्ञा करतो. ‘क्या करना है बोल?’” असा संतप्त सवाल केडिया यांनी राज ठाकरे यांना उद्देशून केला.
या ट्विटनंतर मनसैनिकांनी संताप व्यक्त केला असून, काही कार्यकर्त्यांकडून सुशील केडिया यांना धमक्या मिळाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी आणखी एक ट्विट करत म्हटले आहे की, “मनसेच्या कार्यकर्त्यांकडून मला धमक्या मिळत आहेत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई पोलीस आयुक्तांकडे मी सुरक्षा पुरविण्याची मागणी करतो आहे. भारताचा नागरिक म्हणून मला महाराष्ट्रात सुरक्षित आणि मान-सन्मानाने राहण्याचा अधिकार आहे.”
दरम्यान, मुंबईत एका व्यापाऱ्याला मराठी न बोलल्यामुळे मारहाण झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर, इतर व्यापाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. मनसेची भूमिका स्पष्ट आहे – “मुंबईत राहायचं असेल, तर मराठीचं महत्त्व मान्य करा. मराठी आपलं पाहिजे.”
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होणारा वरळीतील विजयी मेळावा यामुळे अधिक चर्चेत आला आहे. मराठी भाषा, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि शहरातील सामाजिक सलोखा या मुद्द्यांवर आता मोठं राजकारण तापू लागलं आहे.