
हरियाणाच्या हिसार येथील सिव्हिल लाईन्स पोलिसांनी यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. तिच्यासह आणखी पाच जणांनाही अटक करण्यात आली असून, हे सर्वजण हरियाणा आणि पंजाबमधील रहिवासी आहेत. सुरक्षा यंत्रणांच्या माहितीनुसार, या व्यक्तींनी पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेला संवेदनशील माहिती पुरवली होती.
ज्योती मल्होत्रा ही ‘ट्रॅव्हल विथ जो’ या नावाने यूट्यूबवर प्रवासविषयक व्हिडिओ शेअर करत होती. सुरक्षा अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, २०२३ साली तिने कमिशन एजंटकडून व्हिसा मिळवून पाकिस्तानचा दौरा केला होता. या दौऱ्यात तिची ओळख दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयात कार्यरत असलेल्या एहसान-उर-रहीम ऊर्फ दानिश या व्यक्तीशी झाली. भारत सरकारने दानिशला ‘पर्सन नॉन ग्रेटा’ घोषित करून १३ मे २०२५ रोजी उच्चायुक्तालयातून हकालपट्टी केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, दानिशनेच ज्योतीची ओळख पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेशी करून दिली होती.
पोलिसांच्या तपासात असेही उघड झाले आहे की, ज्योती मल्होत्रा आणि तिच्या सहकाऱ्यांनी व्हॉट्सॲप, टेलिग्राम आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून संवेदनशील माहिती शेअर केली होती. या प्रकरणाचा तपास सुरू असून, आणखी काही लोकांची चौकशी केली जात आहे.
या घटनेमुळे देशात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या वापराबाबत सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. पोलिसांनी नागरिकांना सोशल मीडियाचा वापर करताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे