
कॉमेडियन कुणाल कामराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणारे गाणे सादर केल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. या घटनेनंतर मुंबईतील खार येथील युनिकॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये झालेल्या त्याच्या शोच्या ठिकाणी तोडफोड करण्यात आली. तसेच विधानसभेतही या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, “अभिव्यक्ती स्वातंत्र्य असले तरी काहीही बोलण्याची मुभा नाही, आणि त्यावर कारवाई होईल.”
नेमकं काय घडलं?
कुणाल कामराने आपल्या कॉमेडी शोमध्ये एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर व्यंगात्मक गाणी सादर केली. या घटनेनंतर शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी शो झालेल्या हॉटेलमध्ये तोडफोड केली. पोलिसांनी या प्रकरणी तोडफोड करणाऱ्यांविरोधात आणि कुणाल कामराविरोधातही गुन्हे दाखल केले आहेत.
My Statement – pic.twitter.com/QZ6NchIcsM
— Kunal Kamra (@kunalkamra88) March 24, 2025
कुणाल कामराची प्रतिक्रिया
कुणाल कामराने या संपूर्ण वादावर सोशल मिडियाद्वारे प्रतिक्रिया देत चार पानी स्टेटमेंट शेअर केली आहे. त्यात त्याने “हा शो एका अशाच प्रकारच्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. तोडफोड आणि गोंधळ घालणाऱ्यांनी गैरवर्तन केले. मला सांगण्यात आले की, त्यांनी लॉरीभरून टोमॅटो आणले कारण आमच्या बटर चिकनची चव त्यांना आवडली नाही,” असे त्याने मिश्किलपणे म्हटले आहे.
राजकीय प्रतिक्रियांबाबत:
“अभिव्यक्ती स्वातंत्र्य फक्त श्रीमंतांसाठी नाही. माझ्या बोलण्यावर राजकीय लोकांचा दबाव पडणार नाही. मी कायद्याच्या विरोधात काही केलेले नाही. राजकीय सर्कशीवर मी व्यंगात्मक टीका केली आहे,” असे त्याने स्पष्ट केले.
कायदेशीर कारवाईबाबत:
“मी पोलिसांना पूर्ण सहकार्य करणार आहे. मात्र, फक्त माझ्यावरच कारवाई न होता, हॉटेल फोडणाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे. कोणत्याही अधिकृत नोटीसशिवाय ते हातोडे घेऊन कसे आले?” असा सवाल त्याने उपस्थित केला.
धमक्यांबाबत:
“माझा फोन नंबर लीक झाला असून, मला असंख्य धमकीचे कॉल येत आहेत. त्यामुळे मी त्यांना व्हॉइस मेलवर फॉरवर्ड करत आहे,” असे त्याने सांगितले.
मी माफी मागणार नाही..
“मी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची माफी मागणार नाही. मी घाबरणार नाही किंवा कुठेही लपणार नाही,” असे त्याने ठामपणे म्हटले आहे.