
मुंबई : धारावी येथे गॅस सिलेंडर वाहून नेणाऱ्या ट्रकमध्ये भीषण आग लागल्याने मोठा स्फोट झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, लागोपाठ सिलेंडर फुटल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल, पोलीस आणि रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. सुदैवाने, सध्यातरी जीवितहानी झाल्याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही, मात्र मोठ्या वित्तहानीची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ही घटना धारावी बस डेपोच्या जवळ पीएमजीपी कॉलनी परिसरात घडली. ट्रक रस्त्यावर पार्क असताना अचानक आग लागली आणि सिलेंडरचा एकामागून एक स्फोट होऊ लागला. या भीषण दुर्घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भागात अनधिकृतपणे वाहने पार्क केली जात असल्याने अनेक दुचाकीही जळून खाक झाल्याचे सांगण्यात येत आहे. हा मार्ग VIP असल्याची माहिती खासदार वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
आगीच्या घटनेनंतर धारावीतील नागरिक रस्त्यावर उतरले असून, पोलिसांकडून सुरक्षेच्या उपाययोजना केल्या जात आहेत. अग्निशामक दलाच्या 10 ते 12 गाड्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. आग आसपासच्या वस्तीत पसरणार नाही, यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे.
स्थानिक आमदार ज्योती गायकवाड यांनी नागरिकांना घटनास्थळाकडे जाण्याचे टाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच, धारावीकरांनी घाबरून न जाता प्रशासनास सहकार्य करावे, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, अग्निशामक दलाने आग नियंत्रणात आणल्याची माहिती मिळाली आहे. आता ट्रकचे कुलिंग करण्याचे काम सुरू आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली? सिलेंडर वाहून नेणारा ट्रक तिथे उभा कसा होता? या बाबत विविध प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील चौकशी केली जात आहे.