
मुंबई लोकल ही शहराच्या वाहतुकीची लाईफलाईन आहे. लाखो चाकरमानी दररोज लोकलने प्रवास करतात. त्यांच्या दैनंदिन प्रवासाला आणखी रोमांचक बनवण्यासाठी मध्य रेल्वेने “लकी यात्री” योजना सुरू केली आहे. या अनोख्या उपक्रमांतर्गत नियमित तिकीट किंवा पास असलेल्या प्रवाशांना १० हजार ते ५० हजार रुपये जिंकण्याची संधी मिळणार आहे.
काय आहे “लकी यात्री” योजना?
“लकी यात्री” योजना पारदर्शक पद्धतीने राबवली जाणार असून, दररोज एका प्रवाशाला १० हजारांचे बक्षीस दिले जाणार आहे. आठवड्यातून एक प्रवासी ५० हजार रुपये जिंकण्याची संधी मिळवेल. तिकीट तपासणी अधिकारी (टीसी) यादृच्छिक पद्धतीने एका प्रवाशाची निवड करून त्याचं तिकीट किंवा पास तपासतील. हा प्रवासी नियमीत प्रवास करणारा असेल, तर तो लकी यात्री ठरेल आणि त्याला रोख बक्षीस दिले जाईल.
योजनेमागील उद्देश
सध्या मुंबई लोकलमधून प्रवास करणाऱ्या सुमारे २०% प्रवासी विनातिकीट प्रवास करतात. दररोज ४ ते ५ हजार विनातिकीट प्रवासी पकडले जातात. अधिकाधिक प्रवाशांनी अधिकृत तिकीट किंवा पास खरेदी करावा आणि नियमांचे पालन करावे, यासाठी रेल्वेने ही योजना सुरू केली आहे.
प्रवाशांच्या प्रतिक्रिया
रेल्वे प्रवासी वीरेंद्र पवार म्हणतात, “मी रोज कल्याणहून सीएसएमटीपर्यंत प्रवास करतो. तिकीट घेतलं आणि टीसीने ते निवडल्यास १० हजार मिळतील, ही कल्पनाच आनंददायक आहे.” डोंबिवलीच्या श्रुती देसाई म्हणतात, “विनातिकीट प्रवास रोखण्यासाठी ही एक उत्तम योजना आहे.”
कोणासाठी आहे ही योजना?
ही योजना सर्वसामान्य तिकीटधारक आणि पासधारक प्रवाशांसाठी खुली आहे. कोणत्याही श्रेणीतील तिकीट किंवा पास असले तरीही ते ग्राह्य धरले जाईल. लकी यात्री ठरलेल्या प्रवाशाला कोणतेही अतिरिक्त शुल्क न भरता बक्षीस दिले जाईल.
मध्य रेल्वेच्या या अनोख्या उपक्रमामुळे लोकल प्रवाशांमध्ये उत्सुकता वाढली असून, नियमीत तिकीट काढणाऱ्या प्रवाशांसाठी ही सुवर्णसंधी ठरणार आहे. ही योजना पुढील आठ आठवड्यांसाठी लागू करण्यात आली आहे.