भुवनेश्वर: काही राजकीय पक्षांना वाटत होते की, सत्ता हा त्यांचा ‘जन्मसिद्ध हक्क’ आहे. पण जेव्हा त्यांना सत्तेपासून दूर ठेवण्यात आले, तेव्हा त्यांचा रोष देशातील जनतेवर उतरू लागला, अशा तीव्र शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधला. ते ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथे एका जाहीर सभेत बोलत होते.
पंतप्रधान मोदी म्हणाले, “हे सत्तेचे भुकेले लोक पूर्वी चौकीदाराला चोर म्हणत होते. पण आता चौकीदार प्रामाणिक झाला आहे. 2024 च्या निवडणुकीत त्यांना या चौकीदाराबद्दल अपशब्द वापरण्याचीही संधी मिळाली नाही.”
मोदींनी विरोधकांवर आरोप करताना सांगितले की, “या पक्षांनी देशाविरुद्ध कटकारस्थान रचणे सुरू केले आहे. जनतेची दिशाभूल करणाऱ्या अशा लोकांपासून सावध राहावे लागेल.”
भाजपच्या वाढत्या प्रभावाचा उल्लेख
हरियाणा, महाराष्ट्र आणि ओडिशामध्ये भाजपच्या वाढत्या प्रभावाबाबत बोलताना मोदी म्हणाले, “राजकीय तज्ज्ञांनी ओडिशामध्ये भाजपला फेटाळले होते. मात्र, निवडणुकांच्या निकालांनी त्यांच्या भाकीतांवर पाणी फेरले. ओडिशातील जनतेने ‘तीस मार खाँ’ समजणाऱ्या विरोधकांनाही चोख प्रत्युत्तर दिले.”
ओडिशाच्या वारशाचे कौतुक
पंतप्रधान मोदींनी ओडिशातील उत्सव आणि संस्कृतीचे कौतुक करताना सांगितले की, “ओडिशाची संस्कृती आणि वारसा भारताच्या परंपरेला समृद्ध करतो. येथील जनतेचा उत्साह आणि आपुलकी आम्हाला नेहमी प्रेरणा देतो.”
मोदींची गॅरंटी म्हणजे पूर्ण गॅरंटी
सभेच्या शेवटी जनतेला आश्वस्त करताना पंतप्रधान म्हणाले, “…म्हणूनच मी सांगतो, मोदींची गॅरंटी म्हणजे प्रत्येक गॅरंटी पूर्ण होण्याची गॅरंटी. आमचे सरकार जनतेसाठी दिलेली प्रत्येक गॅरंटी पाळते.”
भाजपच्या आगामी रणनीतीवर विश्वास दाखवत, पंतप्रधान मोदींनी पक्षाच्या यशासाठी जनता-प्रथम धोरणाचे महत्त्व अधोरेखित केले.