
प्रत्येक निवडणुकीत मोठे आश्वासनं, गाजावाजा, आणि जनतेला भुलवण्यासाठी नवनवीन अजेंडे मांडले जातात. यावेळी महायुतीचा नारा होता— “एक हैं तो सेफ हैं”, पण 23 तारखेला निकाल लागल्यानंतर ज्या महायुतीने एकत्र येण्याचा दावा केला होता, तीच महायुती आता वेगवेगळ्या वाटांवर चालताना दिसते आहे.
निवडणूक आचारसंहिता, खर्चाची मर्यादा, आणि कायदे हे फक्त जनतेला फसवण्यासाठीच आहेत का, हा प्रश्न उभा राहतो. उमेदवारांच्या खर्च मर्यादेची मर्यादा 40 लाख रुपये असली तरी प्रत्यक्षात निवडणुकीत पैशांचा पाऊस कसा पडतो, हे सर्वांनी पाहिले. यावर कोणती कारवाई झाली? किती जागृत नागरिकांनी आपल्या लोकप्रतिनिधींना विचारले की, दिलेली आश्वासने पूर्ण झाली का?
ईव्हीएमवर आजही प्रश्नचिन्ह आहे. जर सरकारला स्वतःच्या कामगिरीवर एवढा विश्वास आहे, तर बॅलेट पेपरने निवडणुका का घेतल्या जात नाहीत? याचे उत्तर कुणाकडेच नाही.
महायुतीने जातीय-धार्मिक ध्रुवीकरणासाठी *”कटेंगे तो बटेंगे”* सारख्या असंविधानिक शब्दांचा वापर केला. हा आचारसंहितेचा भंग नाही का? मग कारवाई का झाली नाही? प्रचारात महागाई, बेरोजगारी, सरकारी यंत्रणांची ढासळती अवस्था यावर चर्चा केली नाही, उलट जनतेच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष केले गेले.
आज निकालाला आठ दिवस होत असतानाही *”एक हैं तो सेफ हैं”* म्हणणारे तीन वेगवेगळ्या दिशांना का फिरत आहेत? वक्फ बोर्डाच्या निधीवर टीका करणारे लगेच 10 कोटींची घोषणा कशी करतात
भारतीय नागरिकांनी हे समजून घ्यायला हवे की देशाची खरी ताकद संविधानावर आधारित एकतेत आहे. जात, धर्म, प्रांत यापलीकडे जाऊन शांती आणि एकोप्यानेच देशाची प्रगती होऊ शकते. राजकीय सत्तेसाठी होणारे खेळ व भुलथापांना बळी न पडता नेहमी जागृत राहा आणि आपल्या अधिकारांसाठी सजग व्हा.
पाहा जागृत रहा
जागृत महाराष्ट्र न्यूज संपादक अमोल भालेराव मुंबई