
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्या वक्तव्यावर मोठा वाद निर्माण झाला आहे. मुंबईत एका कार्यक्रमात भाषण करताना त्यांनी “मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी येणं गरजेचं नाही” असे विधान केले. या वक्तव्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार टीका केली असून, भारतीय जनता पक्षाने यावर स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी केली आहे.
राज ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया
राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून भय्याजी जोशींवर हल्लाबोल केला. त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळ, भाषावार प्रांतरचना आणि १०६ हुतात्म्यांच्या बलिदानाचा उल्लेख करत, “भय्याजींनी हे विधान बंगळुरू किंवा चेन्नईत जाऊन करून दाखवावे,” असे म्हटले. तसेच, “भय्याजी जोशी यांच्या विधानाशी महाराष्ट्रातील भाजपा सहमत आहे का?” असा थेट सवालही त्यांनी केला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी येणं गरजेचं नाही, असं विधान केल्याच ऐकलं .
देशाची झालेली भाषावार प्रांत रचना, त्यात मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा म्हणून १०६ हुतात्म्यांनी दिलेलं बलिदान या सगळ्याबद्दल भय्याजी…
— Raj Thackeray (@RajThackeray) March 6, 2025
“मराठी जनता दुधखुळी नाही!”
राज ठाकरे पुढे म्हणाले, “मुंबई आणि एमएमआर परिसरातील विकासाच्या आड काही राजकीय हेतू लपलेले आहेत. हे काय चाललंय हे जनता समजून आहे. स्वतः मराठी असूनही जोशींनी हे विधान करणे दुर्दैवी आहे.”
तसेच, “ब्रिटिश गायक ख्रिस मार्टिनसुद्धा मुंबईत येऊन मराठीत बोलतो, मग जोशींना मुंबईची भाषा समजत नाही का? हे राजकीय हेतूशिवाय होत नाही,” असा आरोपही त्यांनी केला. “या असल्या काड्या घालून नवा संघर्ष निर्माण करू नका!” असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.
“गुढीपाडव्याला सविस्तर बोलेन!”
या संपूर्ण प्रकरणावर राज ठाकरे ३० मार्च रोजी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात अधिक सविस्तर भूमिका मांडणार असल्याचे त्यांनी सूचित केले आहे. “मनसे या विधानाचा निषेध नोंदवत आहे आणि मराठी माणूस हे विसरणार नाही!” असे त्यांनी आपल्या पोस्टच्या शेवटी नमूद केले.
भय्याजी जोशींचे नेमके वक्तव्य काय?
विद्याविहारमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलताना भय्याजी जोशी म्हणाले, “मुंबईला एक ठराविक भाषा नाही. येथे अनेक भाषा बोलल्या जातात. घाटकोपरमध्ये गुजराती, गिरगावात मराठी, तर इतर ठिकाणी हिंदी बोलणारे लोक दिसतात. त्यामुळे मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे, असे नाही.”
भय्याजी जोशी यांच्या या विधानावरून राजकीय वातावरण तापले असून, भाजपा यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.