
शासकीय कोट्यातून MBBS प्रवेश मिळवून देतो असे आमिष दाखवून बदलापूर आणि उल्हासनगरमधील तीन व्यक्तींनी डोंबिवली एमआयडीसी परिसरातील एका नागरिकाची तब्बल १६ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केली. ही रक्कम उकळूनही विद्यार्थिनीचा प्रवेश न करता तिचे संपूर्ण शैक्षणिक वर्ष वाया घालवले. ही फसवणूक २०२१ ते २०२२ या कालावधीत घडली असून, याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
असा रचला फसवणुकीचा कट…
तक्रारदाराने आपल्या मुलीच्या MBBS प्रवेशासाठी काही लोकांशी संपर्क केला असता आरोपींनी स्वतःला शिक्षण क्षेत्रातील उच्चपदस्थ असल्याचे भासवले. यापैकी एकाने स्वतःला केईएम रुग्णालयाच्या व्यवस्थापन समितीचा सदस्य, तर दुसऱ्याने नाशिकमधील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील अधिकारी असल्याचे सांगितले.
प्रवेश प्रक्रियेसाठी ५० लाख रुपये लागत असल्याचे सांगून नंतर १५ लाखांवर तडजोड करण्यात आली. हे पैसे नंतर परत मिळतील असा विश्वास तक्रारदाराला दिला. बँक खात्याचा कोरा धनादेश देऊन विश्वास संपादन केला. या भूलथापांना भुलून तक्रारदाराने टप्प्याटप्प्याने १६ लाख ८० हजार रुपये संबंधित खात्यांवर जमा केले.
फसवणूक उघडकीस कशी आली?
रक्कम भरल्यानंतर तक्रारदाराने प्रवेशाविषयी विचारणा सुरू केली. आरोपींनी तुमच्या मुलीचा प्रवेश निश्चित झाला असून तिची परीक्षा आणि गुणपत्रिकासुद्धा तयार आहे, असे सांगून वेळ मारून नेली. यावर संशय आल्याने तक्रारदाराने इतर आरोपींशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी प्रतिसाद देणे बंद केले.
याप्रकरणी तक्रारदाराने मुख्य आरोपीकडे पैसे परत मागितले असता त्याने सुरुवातीला आम्ही आपले पैसे परत करण्याचे आश्वासन दिले, पण नंतर त्यानेही संपर्क तोडला. अखेर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रारदाराने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांचा पुढील तपास सुरू…
या तक्रारीनंतर पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू आहे. पालकांनी अशा भूलथापा आणि फसवणुकीच्या जाळ्यात अडकू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.