
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि तिच्या सहकलाकारांचा “शिवार्पणमस्तु” नृत्य कार्यक्रमही प्रस्तावित आहे. मात्र, या सादरीकरणाला मंदिराच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी विरोध दर्शवला आहे.
माजी विश्वस्तांचा आक्षेप
माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी देवस्थानला पत्र लिहून या कार्यक्रमाच्या पुनर्विचाराची मागणी केली आहे. माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, “महाशिवरात्र हा अत्यंत पवित्र सण आहे. अशा प्रसंगी फक्त धार्मिक कार्यक्रमच होणे आवश्यक आहे. शास्त्रीय नृत्य आणि कथ्थक असायला हवे, मात्र सेलिब्रिटींच्या सहभागाने नव्या प्रथेला सुरुवात होत आहे, जे त्र्यंबकेश्वरच्या परंपरेला धरून नाही.”
महाशिवरात्र उत्सव आणि नियोजित कार्यक्रम
महाशिवरात्र २०२५ निमित्ताने २५ फेब्रुवारी रोजी हळदी समारंभ होणार असून, मंदिराची भव्य फुलांनी सजावट केली जाईल. विविध धार्मिक विधींसह संगीत आणि नृत्याचे कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत. मंगळवारी सायंकाळी सात वाजल्यापासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत बासरी वादनाचा कार्यक्रम होणार आहे. तसेच परंपरेनुसार बुधवारी दुपारी तीन वाजता मंदिरातून श्रीत्र्यंबक राजाची पालखी मिरवणूक निघेल आणि नियोजित मार्गावरुन पालखी पुन्हा देवस्थानमध्ये येईल.त्याचबरोबर सकाळी देवस्थानमध्ये लघुरुद्र तसेच अन्य धार्मिक कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले आहे. या दरम्यान शिव तांडव ग्रुपतर्फे नृत्यसादरीकरण मंदिरासमोर तसेच मुख्य दोन चौकांमध्ये करण्यात येणार असून सायंकाळी आठ वाजता नटरंग अकादमीच्या वतीने शिवार्पणमस्तु नृत्य कार्यक्रमाची प्रस्तुती अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि सहकलाकार सादर करणार आहेत.
दरम्यान, प्राजक्ता माळीने तिच्या “फुलवंती” चित्रपटाच्या यशानंतर अनेक धार्मिक स्थळांना भेट देतेवेळी बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेतले होते. मात्र, त्र्यंबकेश्वरच्या कार्यक्रमावरील वादानंतर तिची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.