
हरियाणाच्या हिस्सार येथे आयोजित सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा काँग्रेसच्या अल्पसंख्याक धोरणांवर जोरदार हल्ला चढवला. काँग्रेसवर लांगूलचालनाच्या राजकारणाचा आरोप करताना मोदींनी थेट आव्हान दिलं की, “जर मुस्लिम समाजासाठी काँग्रेसला खरोखरच एवढा कळवळा असेल, तर त्यांनी आपल्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष एखाद्या मुस्लिम व्यक्तीला करावा.”
काँग्रेसवर अल्पसंख्याकांशी खोटं प्रेम दाखवल्याचा आरोप
पंतप्रधान मोदींनी काँग्रेसच्या भूमिकेला ढोंगी आणि केवळ मतांसाठी बनवलेली भूमिका असल्याचं म्हटलं. “मुस्लिम समाजासाठी खऱ्या अर्थाने काम करण्याची इच्छा काँग्रेसला कधीच नव्हती. त्यांनी केवळ काही कट्टरपंथीयांना खुश करण्याचं राजकारण केलं, जेणेकरून त्यांना निवडणुकीत मतं मिळतील. पण याचा सामान्य मुस्लिम नागरिकांना काहीही फायदा झाला नाही. उलट ते अधिक अडचणीत आले,” असं ते म्हणाले.
“काँग्रेसने जर खरंच मुस्लिम हितासाठी राजकारण केलं असतं, तर त्यांनी आजपर्यंत मुस्लिमांना संसदेमध्ये पुरेसे प्रतिनिधित्व दिलं असतं. मुस्लिम उमेदवारांना ५० टक्के जागांवर तिकीट दिलं असतं. पण त्यांनी हे कधीच केलं नाही,” असं सांगत त्यांनी काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
वक्फ मालमत्ता आणि गरीबांचा हक्क
मोदींनी वक्फ बोर्ड आणि त्याच्या मालमत्तेवरून काँग्रेसवर गंभीर आरोप केले. “देशात लाखो हेक्टर जमीन वक्फच्या मालकीची आहे. या मालमत्तेचा उपयोग जर गरजूंकरिता, गरीब मुस्लिम समाजासाठी झाला असता, तर आज परिस्थिती वेगळी असती. पण काँग्रेसच्या काळात या मालमत्तेचा फायदा काही भू-माफियांना झाला. ही संपत्ती गरिबांपर्यंत पोहोचलीच नाही,” असा आरोप त्यांनी केला.
त्यांनी सांगितलं की, केंद्र सरकारने वक्फ कायद्यात सुधारणा केल्यामुळे आता ही मालमत्ता गरीब मुस्लिम कुटुंब, पसमांदा वर्ग, महिला आणि विशेषतः मुस्लिम विधवा, अनाथ मुलं यांच्यासाठी आरक्षित होणार आहे. “हीच खरी सामाजिक न्यायाची भावना आहे,” असं त्यांनी ठामपणे म्हटलं.
“काँग्रेसने संविधानाचा वापर सत्तेसाठी केला”
पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख करत काँग्रेसवर आणखी एक आरोप केला. “बाबासाहेबांनी संविधानात सामाजिक न्यायाची स्पष्ट रचना मांडली. पण काँग्रेसने त्याच संविधानाचा वापर सत्तेच्या खेळात केला. जेव्हा जेव्हा त्यांना सत्ता टिकवायची होती, तेव्हा त्यांनी संविधानाच्या मूल्यांना पायदळी तुडवलं,” असं ते म्हणाले.
“आणीबाणीच्या काळात संविधानाची आत्मा काँग्रेसने जखमी केली. बाबासाहेबांनी जो विचार दिला होता, तोच काँग्रेसने संपवण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसकडून बाबासाहेबांचा सातत्याने अपमान करण्यात आला,” असा आरोप त्यांनी केला.
पंतप्रधान मोदींचं हे भाषण केवळ काँग्रेसवर टीका करणं नव्हतं, तर त्यांच्या राजकारणाच्या मूल्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा ठरला. मुस्लिम समाजासाठी कोणत्या पक्षाचं धोरण वास्तवात किती प्रभावी आहे, हे ठरवणं आता जनतेच्या हातात आहे.