
गेल्या अनेक महिन्यांपासून सतत वाढत असलेल्या सोन्याच्या भावामुळे सामान्य ग्राहकांची चिंता वाढली होती. सोनं परवडणं कठीण झालं होतं. पण आता ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी आहे. मागील तीन दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये मोठी घसरण होत आहे. या काळात सोन्याचा दर तब्बल 4000 रुपयांनी तर चांदीचा दर 11,000 रुपयांनी कमी झाला आहे.
सध्याचा बाजारभाव
आज (९ एप्रिल २०२५) सोन्याचा दर जीएसटीसह ९१,२६० रुपये आहे, तर चांदीचा दर ९२,७०० रुपये आहे. काही दिवसांपूर्वी सोन्याचा दर ९६,००० रुपयांपर्यंत पोहोचला होता. त्यामुळे इतक्या मोठ्या फरकामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पण तरीही अनेक ग्राहक “वेट अँड वॉच” म्हणजेच प्रतीक्षा करण्याच्या भूमिकेत आहेत. किमती आणखी घसरण्याची शक्यता असल्यामुळे लोक अजून खरेदी करत नाहीयेत.
किंमती घसरण्याची कारणं काय?
सोन्याच्या दरामध्ये घट होण्यामागे अनेक आंतरराष्ट्रीय आणि आर्थिक कारणं आहेत. अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे जागतिक बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. याचा परिणाम सोन्याच्या किमतींवरही झाला आहे. शेअर बाजारात घसरण होत असली तरी, उलटपक्षी सोन्याच्या भावात वाढ होण्याऐवजी घसरण होत आहे.
तज्ज्ञांच्या मते, सोन्याच्या उत्पादनामध्ये मोठी वाढ झाली आहे. उदाहरणार्थ, २०२४ च्या दुसऱ्या तिमाहीत खाणकामातून मिळणारा नफा ९५० डॉलर प्रति औंस इतका वाढला आहे. तसेच ऑस्ट्रेलियासारख्या देशांनीही उत्पादन वाढवलं आहे. रिसायकल सोन्याचाही पुरवठा वाढत आहे.
जागतिक साठा आणि बँकांची भूमिका
सोन्याचा जागतिक साठा २,१६,२६५ टनांपर्यंत पोहोचला आहे, म्हणजेच ९% वाढ झाली आहे. २०२४ मध्ये जगभरातील सेंट्रल बँकांनी एकूण १,०४५ टन सोने खरेदी केलं होतं. पण वर्ल्ड गोल्ड काउन्सिलच्या सर्व्हेनुसार, यंदा सुमारे ७१% सेंट्रल बँकर्स सोनं खरेदी करण्यापासून मागे हटू शकतात किंवा खरेदीचे प्रमाण कमी करू शकतात.
पुढील काळात काय?
तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, सोन्याच्या किमतींमध्ये अजून मोठी घसरण होऊ शकते. काही अंदाजानुसार, सोन्याचा दर प्रतितोळा ५५,००० रुपयांपर्यंत खाली येऊ शकतो. त्यामुळे गुंतवणूकदार आणि ग्राहक दोघंही सध्या विचार करत आहेत की थांबावं की खरेदी करावी.
थोडक्यात सांगायचं झालं तर, सोनं आणि चांदी दोन्ही स्वस्त झालं असून बाजारात खरेदीची संधी आहे. पण अजून थोडा वेळ थांबलं तर अजून स्वस्त दरात खरेदी करण्याची संधी मिळू शकते, असा अंदाज वर्तवला जातोय. तरी, गुंतवणूक करताना बाजारातील स्थिती आणि तज्ज्ञांचा सल्ला लक्षात घेणं आवश्यक आहे.