
वैजापूरमध्ये रस्त्याच्या कामावरून वाद उफाळल्याने शिवसेना शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. भाजपचे कार्यकर्ते कैलास पवार यांनी आमदार बोरनारे यांच्यावर मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी तक्रार दाखल करण्यासाठी ते तीन तास वैजापूर पोलिस ठाण्यात थांबले, तरीही पोलिसांनी तक्रार नोंदवली नसल्याचे पवार यांनी सांगितले.
कैलास पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या घराशेजारी नगरपरिषदेच्या लेआऊटमधील प्लॉट नंबर 48 मध्ये रस्त्याचे काम सुरू आहे. रविवारी सुट्टीच्या दिवशी आमदार रमेश बोरनारे, त्यांचे कार्यकर्ते आणि नगर परिषदेचे अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यावेळी आमदारांनी ठेकेदाराला प्लॉट नंबर 48 मधून रस्ता काढण्याचे आदेश दिले. यावर पवार यांनी लेआऊट पाहण्याची मागणी केली असता, आमदार बोरनारे चिडले आणि त्यांनी पवार यांना धमकावत शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
“तू खूप दिवसांपासून आमच्या डोक्यात आहेस. तुझी फॅमिली संपवायची आहे,” अशी धमकी देत आमदारांनी मारहाण केली, असा आरोप पवार यांनी आपल्या लेखी तक्रारीत केला आहे.
यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार करण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी तीन तास उलटूनही तक्रार नोंदवली नाही. “पोलिस चौकशी करून गुन्हा दाखल करू,” असे उडवाउडवीचे उत्तर देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, आमदार रमेश बोरनारे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, “नागरिकांनी रस्त्याच्या अडचणींबाबत आपल्याकडे अर्ज दिला होता. त्यानुसार आपण नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना बोलावले होते. त्यावेळी कैलास पवार अचानक आले आणि त्यांनी अरेरावीची भाषा केली. त्यामुळे वाद झाला.”
सध्या या प्रकरणामुळे वैजापूर परिसरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक पातळीवरून होत आहे.