
रियाध | सौदी अरेबियाने एक महत्त्वाचा आणि दूरगामी परिणाम करणारा निर्णय घेतला असून भारत, पाकिस्तान, बांग्लादेश, इजिप्तसह १४ देशांच्या नागरिकांना देण्यात येणाऱ्या तात्पुरत्या व्हिसावर बंदी घातली आहे. या निर्णयामुळे या देशांतील नागरिकांना उमरा (छोटा हज), व्यवसायिक दौरे आणि कौटुंबिक भेटींसाठी व्हिसा मिळणं सध्या शक्य होणार नाही.
सौदीच्या परराष्ट्र मंत्रालयाने ही घोषणा केली असून या निर्बंधांची अंमलबजावणी तातडीने करण्यात आली आहे आणि हे निर्बंध जून २०२५ पर्यंत लागू राहतील, अशी अधिकृत माहिती समोर आली आहे.
१३ एप्रिलपर्यंत प्रवेश मुभा
ज्यांच्याकडे याआधीच उमरा व्हिसा आहे, अशा नागरिकांना १३ एप्रिल २०२५ पर्यंत सौदी अरेबियात प्रवेश करण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र त्यानंतर कोणत्याही तात्पुरत्या व्हिसावर प्रवेश बंद करण्यात येणार आहे.
निर्णयामागील पार्श्वभूमी – सुरक्षा आणि व्यवस्थापन हाच उद्देश
सौदी अरेबियातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं की, या निर्णयामागे धार्मिक यात्रेच्या सुरक्षिततेचे कारण असून, अनधिकृत आणि नोंदणी न केलेल्या यात्रेकरूंची वाढती संख्या मोठा धोका ठरू शकते.
गेल्या वर्षी हज यात्रेदरम्यान अत्यधिक उष्णतेमुळे हजारो लोकांना त्रास झाला, तर अनेकांचा दुर्दैवी मृत्यूही झाला. हज यात्रेवेळी अनेकांनी योग्य नोंदणी न करता देशात प्रवेश केल्याचेही निदर्शनास आले.
यामुळे यंदाच्या हजपूर्वीच सौदी प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून उमरा आणि इतर तात्पुरत्या व्हिसांवर काही काळासाठी बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
सौदी सरकारकडून विशेष उपाययोजना
सौदीचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी याबाबत थेट निर्देश दिले असून, यंदा हज यात्रेचं व्यवस्थापन अधिक काटेकोरपणे करण्यात येणार आहे.
तसेच, स्मार्ट तंत्रज्ञानाचा वापर, यात्रेकरूंची पूर्व-नोंदणी, तसेच सुरक्षा आणि वैद्यकीय व्यवस्थांमध्ये मोठी गुंतवणूक करण्याचे संकेत मिळाले आहेत.
कोणकोणते आहेच बंदी लागू असलेले देश ?
या निर्णयामुळे खालील १४ देशांच्या नागरिकांवर तात्पुरती व्हिसा बंदी लागू करण्यात आली आहे:
भारत
पाकिस्तान
बांग्लादेश
इजिप्त
इंडोनेशिया
इराक
नायजेरिया
जॉर्डन
अल्जेरिया
सुदान
इथिओपिया
ट्युनिशिया
येमेन
लीबिया
भारतीय मुस्लीम बांधवांमध्ये चिंता
या निर्णयामुळे भारतात अनेक मुस्लीम कुटुंबांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. अनेकांनी रमजान महिन्यात उमरासाठी तयारी केली होती, तर काहींनी हजपूर्वी सौदीत जाऊन नातेवाईकांना भेटण्याचं नियोजन केलं होतं. आता हे सर्व नियोजन काही काळासाठी स्थगित करणं आवश्यक ठरणार आहे.
सौदी प्रशासनाकडून हे निर्बंध हज यात्रा संपेपर्यंत लागू राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन नव्याने निर्णय घेण्यात येईल, असं संकेत मिळाले आहेत. दरम्यान, सौदी अरेबियामध्ये प्रवेशासाठी नागरिकांनी फक्त अधिकृत आणि नोंदणीकृत मार्गांचा वापर करावा, असं आवाहन देखील करण्यात आलं आहे.