
डॉमिनिकन रिपब्लिकच्या राजधानी सेंटो डोमिंगो शहरात मंगळवारी (8 एप्रिल) रात्री एक भीषण अपघात घडला. येथील जेट सेट नावाच्या एका प्रसिद्ध नाईट क्लबमध्ये अचानकपणे छत कोसळल्यामुळे मोठी जीवितहानी झाली. या अपघातात ९८ लोकांचा मृत्यू झाला असून १६० हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला आहे.
ही दुर्घटना घडली त्यावेळी नाईट क्लबमध्ये एक मोठा म्युझिक कार्यक्रम सुरू होता. क्लबमध्ये 500 ते 1000 लोकांची गर्दी जमली होती. संगीत चालू असतानाच अचानक छत कोसळल्याने एकच गोंधळ उडाला. लोक पळापळ करू लागले. काहीजण थेट छताखाली दबले गेले, तर काहीजण घाईगडबडीत जखमी झाले. ढिगाऱ्याखाली अजूनही काहीजण अडकले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आपत्कालीन सेवा यंत्रणांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. बचावकार्य अजूनही सुरू असून, पोलिस, अग्निशमन दल आणि वैद्यकीय पथकांनी एकत्रितपणे जखमींना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत. आपत्कालीन ऑपरेशन सेंटरचे प्रमुख जुआन मॅन्युएल मेंडेझ यांनी सांगितले की, “ढिगाऱ्याखाली काही लोक अजूनही जिवंत असण्याची शक्यता आहे, आणि आम्ही एकाही जीवाचा बचाव होईपर्यंत प्रयत्न थांबवणार नाही.”
या अपघातात अनेक नामवंत व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. मोंटेक्रिस्टी प्रांताचे गव्हर्नर नेल्सी क्रूझ, तसेच माजी मेजर लीग बेसबॉल खेळाडू ऑक्टाव्हियो डोटेल यांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, प्रसिद्ध मेरेंग्यू गायिका रुबी पेरेझ या देखील त्या कार्यक्रमात परफॉर्म करत असताना या घटनेत दगावल्या. त्यांचे मॅनेजर एनरिक पॉलिनो यांनी सांगितले, “कार्यक्रम रात्री 12 वाजता सुरू झाला होता आणि एक तासातच छत कोसळले. मला वाटले भूकंप झाला आहे. मी कसा तरी एका कोपऱ्यात जाऊन बचावलो.”
या अपघातानंतर डॉमिनिकन रिपब्लिकचे राष्ट्राध्यक्ष लुईस अबिनाडर यांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी लिहिले, “जेट सेट नाईट क्लबमधील घटनेने आम्हाला प्रचंड दुःख झाले आहे. आम्ही यावर प्रत्येक क्षणाला लक्ष ठेवून आहोत. पीडित कुटुंबांसोबत आमची सहवेदना आहे.”
ही घटना संपूर्ण देशासाठी एक दुःखद आणि धक्का देणारी आहे. अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सरकारी यंत्रणा पूर्ण ताकदीनिशी कार्यरत असून मृतांना श्रद्धांजली व जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी सर्वत्र प्रार्थना केली जात आहे.