
पुणे – दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा रक्तस्राव होत असतानाही रुग्णालयाने वेळेवर उपचार दिले नाहीत, असा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, रुग्णालय प्रशासनाने आधी दहा लाख रुपये भरण्याची अट घातली होती. पैशाअभावी उपचार न मिळाल्याने तनिषा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
नेमकं काय घडलं ?
तनिषा भिसे या सात महिन्यांच्या गर्भवती होत्या. त्यांना रक्तस्राव सुरू झाल्यानंतर ३० मार्च रोजी सकाळी ९ वाजता कुटुंबीयांनी त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी बीपी वाढल्याचे सांगून त्यांना नव्या इमारतीत तिसऱ्या मजल्यावर हलवले. तिथे तपासणीनंतर डॉक्टरांनी सांगितले की, परिस्थिती गंभीर असून शस्त्रक्रिया (C-section) करावी लागेल.
१० लाख भरले तरच उपचार सुरु होतील.
तनिषा यांची नणंद प्रियांका पाटील यांनी सांगितले की, “डॉक्टरांनी सांगितले की बाळं वेळेपूर्वी जन्माला येणार आहेत, त्यामुळे NICU (विशेष काळजी युनिट) लागेल. प्रत्येकी दहा लाख, म्हणजे दोन्ही बाळांसाठी २० लाखांचा खर्च येईल. त्यापैकी आधी दहा लाख भरावेत, अन्यथा तुम्ही ससून रुग्णालयात जा, असं त्यांनी सांगितलं.”
तनिषा समोरच हे सर्व बोलल्यामुळे त्या मानसिकदृष्ट्या खचल्या. त्याच वेळी त्यांचा रक्तस्राव सुरूच होता. “आम्ही वारंवार विनंती करत होतो की, आम्ही पैसे जमवतो, पण कृपया उपचार सुरू करा,” असंही प्रियांका यांनी सांगितलं. मात्र रुग्णालयाने कोणतीही वैद्यकीय मदत दिली नाही, असा आरोप त्यांनी केला.
रुग्णालयाचे उत्तर:
या आरोपांवर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी रवी पालेकर यांनी सांगितले की, “घटनेची चौकशी केली जात आहे. सध्या जी माहिती समोर येत आहे, ती दिशाभूल करणारी आहे. आम्ही सर्व माहिती चौकशी यंत्रणांना देऊ.”
तनिषा यांचे पती कोण आहेत?
तनिषा भिसे यांचे पती सुशांत भिसे हे भाजपाचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक आहेत. आमदार गोरखे यांनी सुद्धा रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधून विनंती केली होती, तरीही उपचार सुरू करण्यात आले नाहीत, अशी देखील माहिती समोर येत आहे.
बाळांची प्रकृती काय?
तनिषा यांच्या जुळ्या बाळांपैकी एका बाळाचे व्हेंटिलेटर काढण्यात आले असून दोघांचीही प्रकृती सध्या स्थिर आहे, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली आहे.
शिवाय तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे मृत्यू झाला, असा कुटुंबीयांचा आरोप आहे. रुग्णालयाने पैसे आधी मागितल्यामुळे वेळ वाया गेला, असा दावा असून, या प्रकरणाची चौकशी सध्या सुरू आहे. या घटनेमुळे पुण्यासह राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे.