
पुणे : राज्य सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत महिलांमध्ये प्रचंड अपेक्षा आहेत. मात्र, या योजनेतील २१०० रुपये दरमहा देण्यासंदर्भात अद्याप कोणताही स्पष्ट निर्णय झालेला नाही. यासंदर्भात विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट सांगितले की, “या योजनेतून महिलांना २१०० रुपये कधी मिळतील, याबाबत कुणीच ठामपणे सांगितलेले नव्हते आणि सध्या तरी हे सांगता येणार नाही. यासाठी पाच वर्षे वाट पाहावी लागू शकते.”
पुण्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. गोऱ्हे बोलत होत्या. त्या म्हणाल्या, “या सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. त्यामुळे लगेचच महिलांच्या हाती २१०० रुपये पडतील, अशी अपेक्षा ठेवणे योग्य नाही. ही योजना महत्त्वाकांक्षी असली, तरी त्याची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने होईल. महिलांना निश्चितच लाभ मिळेल, पण त्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागेल.”
विधिमंडळाच्या कामकाजाचा आढावा
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी विधिमंडळ अधिवेशनातील कामकाजाचा आढावा देखील यावेळी सविस्तर मांडला. त्या म्हणाल्या, “विधान परिषदेचे एकूण ११५ तास आणि विधानसभेचे १४६ तास कामकाज झाले. या अधिवेशनात विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. अहिल्याबाई होळकर यांची जन्म त्रिशताब्दी, महिला पंचदशकपूर्ती आणि भारतीय राज्यघटनेचा अमृत महोत्सव यांसारख्या विषयांवर महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात आले.”
महिलांविषयी अपशब्दांचा निषेध
डॉ. गोऱ्हे यांनी विरोधकांच्या आक्रमक भूमिकेवर देखील नाराजी व्यक्त केली. त्या म्हणाल्या, “पूर्वी सरकार स्थापनेनंतर दोन वर्षांनी विरोधी पक्षांचे आंदोलने होत असत. मात्र, या वेळेस सुरुवातीपासूनच विरोधक आक्रमक झाले आहेत. त्यातच महिलांविषयी अपशब्द वापरण्यात आले. हे विधिमंडळाच्या परंपरेला योग्य नाही. काही जण केवळ ‘हिरोगिरी’साठी अशी वक्तव्य करतात, मात्र त्यांना कोणते शब्द वापरायचे आणि कोणते नाही, याचे भान राहिले पाहिजे. या प्रकारांविरोधात मतदारांनीही आता प्रश्न विचारायला हवेत.”
महिलांचे सक्षमीकरण हेच मुख्य ध्येय
महिलांचे सक्षमीकरण अत्यंत आवश्यक असल्याचे सांगत डॉ. गोऱ्हे पुढे म्हणाल्या, “महिलांच्या आर्थिक, सामाजिक उन्नतीसाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत. त्या प्रत्यक्षात कितपत प्रभावी ठरतात, याचा आढावा घेण्यासाठी मी काही जिल्ह्यांचा दौरा करणार आहे. महिला सक्षमीकरणासाठी सरकार कटिबद्ध आहे.”
शिवाजीनगरचे नामकरण बदलणार
दरम्यान, पुण्यातील शिवाजीनगरचे नाव बदलून ‘छत्रपती शिवाजी महाराज नगर’ करण्यास मुख्यमंत्री आणि पुणे महापालिकेच्या आयुक्तांना निर्देश दिले असल्याची माहितीही डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी दिली.