
पुण्यातील कोथरूडमधील व्यावसायिक लक्ष्मण साधू शिंदे (वय ५५) यांची बिहारमध्ये अपहरण करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. व्यवसायाच्या निमित्ताने ते पाटणा येथे गेले होते, मात्र तेथून पुन्हा परतलेच नाहीत.
शिंदे यांचा मृतदेह जहानाबाद जिल्ह्यात रस्त्यावर आढळून आला. जर वेळेवर ओळख पटली नसती, तर पोलीस त्यांचा अंत्यसंस्कार “बेवारस मृतदेह” म्हणून करणार होते, अशी माहिती समोर आली आहे.
स्वस्त मशिनरीचे आमिष दाखवून फसवणूक
लक्ष्मण शिंदे यांना काही दिवसांपूर्वी एका अज्ञात व्यक्तीने ईमेलद्वारे संपर्क साधला होता. त्यात स्वस्त दरात कंपनीचे टूल्स आणि मशिनरी विकण्याचे आमिष दाखवण्यात आले. यासाठी त्यांना बिहारच्या पाटणा येथे बोलावण्यात आले. ११ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता ते इंडिगोच्या विमानाने पाटणा येथे पोहोचले.
पत्नीशी शेवटचा संवाद आणि संशयास्पद कॉल
पाटणा पोहोचल्यावर त्यांनी पत्नी रत्नप्रभा यांना फोन करून सांगितले की, “शिवराज सागी नावाच्या व्यक्तीने गाडी पाठवली असून, त्याच्यासोबत कोल इंडिया कंपनीच्या कार्यालयात जाणार आहे.” मात्र रात्री साडे नऊ वाजता त्यांच्या फोनवर संपर्क होऊ शकला नाही. एक तासाने फोन पुन्हा लागला, पण अज्ञात व्यक्तीने तो उचलून सांगितले की, शिंदे बाथरूममध्ये आहेत. त्यानंतर त्यांचा फोन बंद झाला.
मृतदेहाची उशीरा ओळख
१२ एप्रिल रोजी जहानाबाद जिल्ह्यात घोषी पोलिस स्टेशनच्या हद्दीत झुमकी व मानपूर गावाच्या मध्ये शिंदे यांचा मृतदेह सापडला. ओळख पटली नसल्यामुळे पोलीस मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याच्या तयारीत होते. मात्र पुण्यातून त्यांच्या साडू विशाल लोखंडे यांनी तक्रार दाखल केल्यानंतर, शिंदे यांचे फोटो बिहार पोलिसांना पाठवण्यात आले. त्यानंतर ओळख पटली आणि मृतदेह त्यांच्या नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.
गळा दाबून हत्या; खंडणीसाठी कट?
पोलीस तपासात हे समोर आले आहे की खंडणी मिळवण्यासाठी शिंदे यांचे अपहरण करण्यात आले होते. मात्र पैसे न मिळाल्यामुळे त्यांचा गळा दाबून खून करण्यात आला. या प्रकरणी सायबर गुन्हेगारांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
पाटणा पोलीस आणि पुणे पोलीस मिळून या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.