
प्रसिद्ध युट्यूबर रणवीर अलाहाबादिया सध्या मोठ्या वादात अडकला आहे. कॉमेडियन समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमध्ये केलेल्या एका वक्तव्यामुळे रणवीरअलाहाबादियावर विविध स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या शोमध्ये रणवीरने एका स्पर्धकाला विचारलेल्या आक्षेपार्ह प्रश्नावरून मोठा वाद निर्माण झाला होता. यावर त्याने जाहीर माफी मागितली असली, तरी त्याच्याविरुद्ध विविध ठिकाणी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर रणवीर अलाहाबादियाने पासपोर्टसाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने त्याची मागणी फेटाळली आहे. त्यामुळे सध्या तरी त्याला पासपोर्ट मिळणार नाही. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, या प्रकरणाची पुढील सुनावणी दोन आठवड्यांनी होणार आहे.
गुवाहाटी, मुंबई आणि जयपूर येथे रणवीर अलाहाबादियाविरोधात दाखल एफआयआरच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने त्याला अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले आहे. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला कळवले की, या प्रकरणाची चौकशी दोन आठवड्यांत पूर्ण होईल. या कालावधीत तपासावर परिणाम होऊ नये म्हणून सर्वोच्च न्यायालयाने त्याला पासपोर्ट देण्यास नकार दिला आहे आणि पुढील सुनावणीसाठी दोन आठवड्यांनी उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.
The Supreme Court says it will consider the application of YouTuber and Podcaster Ranveer Allahabadia to release his passport to travel abroad after the investigation into the controversial remarks made by him and others in an episode of India’s Got Latent is completed.… pic.twitter.com/RMJ4XTMxHl
— ANI (@ANI) April 1, 2025
रणवीर अलाहाबादियाच्या विधानामुळे वाद निर्माण होण्यामागील कारण?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमध्ये रणवीर अलाहाबादियाने एका स्पर्धकाला अत्यंत अश्लील आणि आक्षेपार्ह प्रश्न विचारला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वाद वाढला. यानंतर, रणवीर अलाहाबादिया, शो होस्ट समय रैना आणि इतरांवर पोलीस तक्रारी दाखल झाल्या. या प्रकरणात त्यांच्यावर अश्लीलतेला प्रोत्साहन दिल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
तसेच या प्रकरणातील पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.