
मुंबई : गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर लोकार्पण झालेल्या मलबार हिल परिसरातील ‘निसर्ग उन्नत मार्ग’ मुंबईकरांच्या विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने या मार्गाला भेट दिली आहे. ३१ मार्चच्या सार्वजनिक सुटीच्या निमित्ताने सर्व ऑनलाईन तिकिट स्लॉट हाऊसफुल्ल झाले असून, आगामी आठवड्यासाठीही आगाऊ तिकिट नोंदणी पूर्ण झाली आहे. अवघ्या दोन दिवसांत तीन हजारांहून अधिक पर्यटकांनी या मार्गाचा आनंद घेतला.
महानगरपालिकेने सिंगापूरच्या ‘ट्री टॉप वॉक’च्या धर्तीवर सुमारे ३० कोटी रुपये खर्चून निसर्ग उन्नत मार्ग विकसित केला आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते रविवारी या मार्गाचे लोकार्पण करण्यात आले. ३० मार्च रोजी १,०५३ मुंबईकरांनी या मार्गाला भेट दिली, ज्यातून महापालिकेला २६,९२५ रुपयांचा महसूल मिळाला. तर ३१ मार्च रोजी २,३४६ पर्यटकांनी या मार्गाचा आनंद घेतला, आणि ६०,३०० रुपयांचा महसूल जमा झाला. तसेच आठवडाभरासाठीही आगाऊ तिकिट बुकिंग मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.
शेकडो झाडांमध्ये मार्गिका तयार करताना पर्यावरणाला कोणतीही हानी न पोहोचवता हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला आहे. हा मार्ग दररोज पहाटे ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत खुला राहणार आहे. येथे मुंबईच्या जैवविविधतेचा आनंद घेता येतो. १०० हून अधिक वनस्पतींसह विविध पक्षी, सरपटणारे प्राणी यांचे दर्शन घेण्याची संधी मिळते. तसेच, पर्यटकांना गिरगाव चौपाटीचे विहंगम दृश्य अनुभवता येते. मात्र, पूर्वपरवानगीशिवाय चित्रीकरणास मनाई करण्यात आली आहे.
सुविधांची प्रभावी अंमलबजावणी आणि संरक्षण उपाययोजना महानगरपालिका आयुक्त व प्रशासक भूषण गगराणी यांनी पर्यटकांसाठी सोयी-सुविधांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने काटेकोर नियोजन करण्याबरोबरच पर्यावरणपूरक स्वच्छतेसाठी विशेष लक्ष देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. मुंबईतील पर्यटकांसाठी हा एक आदर्श प्रकल्प ठरेल, त्यामुळे परिरक्षणाच्या दृष्टीने विशेष काळजी घेण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
ऑनलाईन तिकिट बुकिंग सुविधा ‘निसर्ग उन्नत मार्ग’ पाहण्यासाठी https://naturetrail.mcgm.gov.in/ या संकेतस्थळावरून ऑनलाईन तिकीट बुकिंग करता येईल. भारतीय नागरिकांसाठी २५ रुपये, तर परदेशी पर्यटकांसाठी १०० रुपये प्रवेश शुल्क निश्चित करण्यात आले आहे. प्रत्येक स्लॉटसाठी एका तासाचा कालावधी असून, बारकोडच्या सहाय्यानेच पर्यटकांना प्रवेश दिला जाणार आहे.
मुंबईकरांसाठी हा निसर्ग सहवास एक अनोखा अनुभव ठरत असून, पर्यटकांचा सकारात्मक प्रतिसाद लाभत आहे.