
मुंबई — स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय)ला तब्बल ७६४ कोटी रुपयांचा फटका बसलेल्या बुडीत कर्ज घोटाळ्यात विंध्यवासिनी ग्रुप ऑफ कंपन्यांचे प्रवर्तक व संचालक विजय आर. गुप्ता यांना अखेर ईडीने अटक केली आहे. विविध बनावट कागदपत्रांच्या आधारे गुप्ता आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बँकेकडून मोठ्या प्रमाणात कर्ज मिळवून अफरातफर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. ईडीने त्यांना मुंबईतून अटक करून न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.
बनावट कागदपत्रांचा वापर आणि बँकेची फसवणूक
सीबीआयच्या आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या गुन्ह्यानंतर ईडीने या प्रकरणाचा तपास हाती घेतला होता. चौकशीत उघड झाल्यानुसार, विंध्यवासिनी ग्रुपच्या सहा कंपन्यांनी मिळून स्टेट बँकेकडून विविध टर्म लोन आणि कॅश क्रेडिट सुविधा घेतल्या. या कर्जासाठी त्यांनी बनावट आणि फुगवलेले करार, खोटी कागदपत्रे वापरली. पुढे २०१३ मध्ये ही सर्व खाती बुडीत घोषित झाली आणि बँकेला एकूण ७६४.४४ कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागले.
४० पेक्षा अधिक बनावट कंपन्यांचा वापर
तपासात अधिक धक्कादायक बाब समोर आली की, विजय गुप्तांनी कर्जाची रक्कम वळवण्यासाठी तब्बल ४० पेक्षा अधिक बनावट कंपन्या तयार केल्या. या कंपन्यांच्या माध्यमातून कर्जाची रक्कम व्यवहारात आणली गेली. त्यानंतर या रकमेतून मुंबई आणि परिसरात अनेक मालमत्ता खरेदी केल्याचे ईडीच्या तपासात स्पष्ट झाले आहे.
स्टील रोलिंग मिल्स आणि मॉल प्रकल्पात रक्कम गुंतवली
गुप्तांनी कर्जातून मिळालेली रक्कम स्टील रोलिंग मिल्स (सिल्वासा आणि महाराष्ट्र) व मॉल बांधणीसाठी वापरल्याचे सांगण्यात येत होते. मात्र प्रत्यक्षात ही रक्कम बनावट व्यवहारात गुंतवली गेली. फुगवलेले करार दाखवून बँकेकडून मोठी रक्कम उचलण्यात आली होती. ईडीने या प्रकरणी मिळालेल्या मालमत्तांची यादी तयार करण्याचे काम सुरू केले आहे.
सध्या गुप्ता ईडी कोठडीत
सध्या विजय गुप्ता हे ईडीच्या ताब्यात असून पुढील सात दिवस त्यांची चौकशी होणार आहे. दुसरीकडे, गुप्तांच्या वकिलांनी त्यांची कोठडी गरजेची नसल्याचा युक्तिवाद केला होता, परंतु कोर्टाने ईडीचा युक्तिवाद मान्य करत त्यांना कोठडी सुनावली.
ईडीचा तपास सुरू असून या प्रकरणात अजून अनेक धागेदोरे उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.