
मुंबई: समाजवादी पक्षाचे नेते आणि मानखुर्द-शिवाजीनगरचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाबद्दल केलेल्या विधानामुळे राज्याच्या राजकारणात मोठा वाद उफाळला. त्यांच्या वक्तव्यावर विधानसभेत प्रखर विरोध होताच, अखेर आझमी नरमले आणि त्यांनी आपले वक्तव्य मागे घेतले.
- विधानसभेत प्रचंड गदारोळ
आज (४ मार्च) विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी भाजपा व शिवसेना (शिंदे गट) आमदारांनी सभागृहात आझमी यांच्या वक्तव्यावरून जोरदार गोंधळ घातला. “आझमी यांनी माफी मागावी,” अशी मागणी करण्यात आली. या गोंधळामुळे अखेर विधानसभेचे कामकाज तहकूब करावे लागले. - नेमकं काय म्हणाले होते अबू आझमी?
काल विधिमंडळाच्या बाहेर माध्यमांशी बोलताना अबू आझमी यांनी “औरंगजेब हा क्रूर प्रशासक नव्हता” असे विधान केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर जोरदार टीका झाली. - वक्तव्य मागे घेताना आझमी म्हणाले…
गोंधळानंतर अबू आझमी यांनी स्पष्टीकरण देत वक्तव्य मागे घेतले. ते म्हणाले, “माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला. मी कोणाचाही अपमान केलेला नाही. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज यांचा मी आदर करतो. विधानसभेचे कामकाज तहकूब होऊ नये म्हणून मी वक्तव्य मागे घेतो.” - सत्ताधाऱ्यांचा आक्रमक पवित्रा कायम
या मुद्द्यावरून भाजप व शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेतली असून, आझमी यांच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे.