
मुंबई : समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबावर दिलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. “औरंगजेब हा क्रूर प्रशासक नव्हता, त्याने मंदिरे बांधली” असे विधान आझमी यांनी केल्यानंतर राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
अंबादास दानवे यांची कडवी प्रतिक्रिया
शिवसेना (ठाकरे गट) नेते अंबादास दानवे यांनी या विधानावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “औरंगजेबाने कोणती मंदिरे बांधली? याची यादी द्या, आणि त्याने किती मंदिरे तोडली याची यादी आम्ही तुम्हाला देतो”, असे आव्हान त्यांनी अबू आझमी यांना दिले आहे.
अबू आझमी यांचे विधान काय?
अबू आझमी यांनी “चुकीचा इतिहास दाखवला जातो. औरंगजेबाने अनेक मंदिरे बांधली होती. तो क्रूर प्रशासक नव्हता. छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील लढाई धर्माची नव्हती, ती राज्यकारभारासाठीची होती. त्या काळात भारताचा GDP २४% होता आणि आपली सीमा अफगाणिस्तानपर्यंत होती,” असे वादग्रस्त विधान केले.
राजकीय नेत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया
- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे : “औरंगजेबाचे उदात्तीकरण करणे दुर्दैवी आहे. अबू आझमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला हवा.”
- आदित्य ठाकरे : “अबू आझमींनी कोणाच्या सुपारीवर असे विधान केले? महाराष्ट्रात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यावर कठोर कारवाई झाली पाहिजे.”
अबू आझमी यांच्या वक्तव्यावरून राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, आगामी राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे.