
राज्यात वाढत्या अमली पदार्थांच्या वापराला आळा घालण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने शाळांमध्ये शपथ घेण्याचा उपक्रम राबवण्याचा विचार असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हा निर्णय जाहीर केला.
अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबद्दल विद्यार्थ्यांना अधिक जागरूक करण्यासाठी शालेय प्रार्थनेवेळी विशेष शपथ घेतली जाणार आहे. या शपथेमध्ये, “मी कोणत्याही प्रकारची नशा करणार नाही आणि माझ्या आजूबाजूला जर अशा पदार्थांचा वापर होताना दिसला, तर मी त्वरित शिक्षक व पालकांना कळवेन,” अशा प्रकारचा आशय असणार आहे. तसेच, प्रत्येक वर्गात दररोज दहा मिनिटे एका शिक्षकाने अमली पदार्थांचे दुष्परिणाम यावर मार्गदर्शन करावे, असा प्रस्ताव शिक्षण विभागाकडे सादर करण्यात आला आहे.
जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी आणि कायदा–सुव्यवस्था मजबूत करण्याच्या दृष्टीने प्रशासन विशेष पावले उचलत आहे. अल्पवयीन मुलांचा वाढता सहभाग चिंतेचा विषय असल्यामुळे आवश्यक त्या कायद्यात सुधारणा करण्यावर सरकार गांभीर्याने विचार करत आहे.
गुन्हेगारी रोखण्यासाठी जिल्ह्यात अतिरिक्त पोलीस अधिक्षकांच्या अध्यक्षतेखाली सहा उपअधिक्षकांची कृती समिती स्थापन करण्यात आली असून, आठवडाभरात हा टास्क फोर्स आपला अहवाल सादर करेल. पोलिसांना आवश्यक सुविधा पुरवण्यासाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून मदत केली जाणार असल्याचेही मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.
या पत्रकार परिषदेला आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, तसेच भाजप जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे आदी उपस्थित होते.