मुंबईतील मालाडच्या चिकूवाडी परिसरात प्रशासनाच्या बेकायदेशीर कारवाईमुळे शेकडो कुटुंबं उद्ध्वस्त झाली आहेत. आपल्या आयुष्याची सगळी पुंजी लावून घरं खरेदी करणाऱ्या सामान्य माणसाला आज या भ्रष्ट व्यवस्थेनं रस्त्यावर आणलं आहे.
नागरिकांनी झा नावाच्या भू-माफियाला लाखो रुपये देऊन घरं विकत घेतली. व्यवहाराच्या प्रत्येक टप्प्यावर प्रशासनाचा मूक पाठिंबा होता. वीज मीटरसाठी मंजुरी देणारे हेच अधिकारी, जागेवर बांधकाम सुरू असताना गप्प बसलेले हेच अधिकारी, आज अचानक कारवाई करत आहेत. “जर ही जागा अनधिकृत होती, तर अतिक्रमण सुरू असताना प्रशासन गप्प का होतं? बांधकाम होत असताना त्यांना आंधळं आणि बहिरं काय झालं होतं?” असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
घटनास्थळी नागरिकांनी उघड आरोप केला आहे की, “प्रशासनातील अधिकाऱ्यांनी भू-माफियांशी हातमिळवणी करून आमची लूट केली आहे. सगळं व्यवहार पूर्ण होईपर्यंत गप्प राहून आता स्वप्नं उद्ध्वस्त करण्याचा खेळ सुरू आहे.”
प्रशासनाच्या या बेकायदेशीर कारवाईने कुटुंबं अक्षरश: रस्त्यावर आली आहेत. लहान मुलं, वृद्ध आणि महिलांची दैना उडाली आहे. “आमचं आयुष्य उभं करण्यासाठी वर्षानुवर्षं घाम गाळला, आणि आज या भ्रष्ट व्यवस्थेनं आम्हाला रस्त्यावर आणलं. आता कोण न्याय देणार? कोण जबाबदार?” अशी आक्रोशपूर्ण मागणी होत आहे.
सामान्य माणसाला भिकेला लावणाऱ्या या लुटारू व्यवस्थेला कोणाचा पाठींबा आहे? हे अधिकारी आणि भू-माफिया किती काळ सामान्य जनतेची लूटमार करत राहणार? ही लाचखोर व्यवस्था संपवण्यासाठी कोणी पुढं येणार का? की नागरिकांना असंच रस्त्यावर फेकून देण्यातच यांची महानता दिसते?
भ्रष्टाचार आणि बेकायदेशीर कारवायांनी सामान्य माणसाच्या स्वप्नांवर केलेला हा क्रूर घाला सहन होणार नाही, असा इशारा नागरिकांनी दिला आहे. आता या व्यवस्थेला कोणी धडा शिकवणार की पुन्हा एकदा ही लाचखोरी निर्दोष माणसांच्या आयुष्याशी खेळणार?
पाहा जागृत, रहा जागृत
जागृत महाराष्ट्र न्यूज संपादक अमोल भालेराव,मालाड मुंबई