श्रीक्षेत्र माहूर प्रतिनिधी – अविनाश पठाडे

माहूर तालुक्यात बिबट्याच्या वाढत्या सक्रियतेमुळे नागरिक भयभीत झाले असून, वनविभागाच्या उदासीनतेमुळे परिस्थिती अधिक गंभीर होत आहे. महिनाभरानंतर पुन्हा एकदा बिबट्याने शहरात दर्शन दिल्याने परिसरात दहशत पसरली आहे. विशेषतः उघड्यावर शौचास जाणाऱ्यांसाठी ही स्थिती जीवघेणी ठरत आहे.

शहरातील मोकळ्या भुखंडांवर बिबट्याचा वावर दिसून आला असून, आतापर्यंत मनुष्यहानी झालेली नसली तरी पाळीव प्राणी व मोकाट कुत्र्यांवर हल्ले होत आहेत. नागरिकांप्रमाणे, वनविभागाचे या संदर्भातील दुर्लक्ष बिबट्याच्या हल्ल्यांना आमंत्रण देणारे ठरत आहे.

बिबट्याची दहशत पुन्हा उफाळली
महिनाभरापूर्वी माहूर तालुक्यात नर आणि मादी बिबट्याने दोन पिल्लांसह हल्ले करून अनेक पाळीव जनावरांचा फडशा पाडला होता. त्यानंतर बिबट्याच्या दर्शनाने विश्रांती घेतली असली, तरी आता नर बिबट्या पुन्हा सक्रिय झाला आहे. 1 डिसेंबर रोजी तहसील कार्यालय परिसरात शौचास बसलेल्या नागरिकांना बिबट्याने अचानक दर्शन दिल्याने एकच खळबळ उडाली.

शेतकऱ्यांचा संघर्ष वाढतोय
दिवसा देखील बिबट्याचे दर्शन होत असल्याने शेतीकामे करणारे शेतकरी शेतात जाण्यास घाबरत आहेत. तहसील परिसरातील जंगल आणि मोकळ्या जागांमध्ये बिबट्याच्या डरकाळ्या ऐकू येत आहेत. नागरिकांनी वनविभागाकडे तातडीने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली आहे.

“वनविभाग सुस्त, नागरिक संतप्त
तालुक्यात बिबट्याचे हल्ले वाढले असून, कालवडी आणि शेळ्या यांसारख्या प्राण्यांवर हल्ल्यांचे प्रमाण मोठे आहे. मात्र, बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावलेला नाही. नागरिकांनी वनविभागाला वारंवार विनंती करूनही दुर्लक्ष होत असल्याने संताप व्यक्त होत आहे. “वनविभाग माणसावर हल्ला होण्याची वाट पाहत आहे का?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.”