
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर झालेल्या बलात्कारप्रकरणी फरार आरोपी दत्तात्रय गाडेला पुणे पोलिसांनी अखेर अटक केली आहे. दोन दिवसांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता, मात्र ड्रोनच्या मदतीने शोधमोहीम राबवत त्याला गावातील एका कॅनॉलजवळ पकडण्यात आलं.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, या प्रकरणात स्थानिक नागरिकांनी मोठी मदत केली आहे. ज्याने आरोपीबाबत शेवटची महत्त्वपूर्ण माहिती दिली, त्याला १ लाख रुपयांचं बक्षीस दिलं जाणार आहे. तसेच, आरोपीचा शोध घेण्यात मदत करणाऱ्या गावकऱ्यांचा लवकरच सत्कार करण्यात येईल.
सीसीटीव्हीच्या आधारे पटली ओळख
स्वारगेट बस स्थानकातील २३ आणि परिसरातील ४८ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून अवघ्या दोन तासांत पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली होती. मात्र, सतत ठिकाणं बदलत असल्याने त्याला पकडायला वेळ लागला. अखेर, आज त्याला अटक करण्यात आली असून, त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
आरोपीने केला आत्महत्येचा प्रयत्न?
प्राथमिक वैद्यकीय तपासणीत आरोपीच्या गळ्यावर दोरीच्या वळांचे निशाण दिसले असून, त्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा दावा केला जात आहे. मात्र, या दाव्याची पडताळणी करण्यासाठी पोलिस अधिक चौकशी करत आहेत.
महिला सुरक्षेवर सवाल
या घटनेनंतर पुण्यात संतापाची लाट उसळली आहे. महिलांच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त होत असून, बसस्थानकांमध्ये सुरक्षाव्यवस्था वाढवण्याची मागणी केली जात आहे. पुणे पोलिसांनी या प्रकरणी कठोर कारवाईचं आश्वासन दिलं आहे.