अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या एका वादग्रस्त प्रकरणामुळे चर्चेत आली आहे. भाजपा आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर टीका करताना काही अभिनेत्रींची नावे घेतली, ज्यामध्ये प्राजक्ता माळीचं नाव देखील होतं. त्यामुळे हा वाद चांगलाच पेटला असून उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे.
२८ डिसेंबरला घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्राजक्ता माळीने आपल्या भावना व्यक्त करत सुरेश धस यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला. या प्रकरणावरून मराठी कलाविश्व प्राजक्ताच्या पाठीशी उभं राहिलं आहे. अनेक कलाकार सोशल मीडियावर पोस्ट करत जाहीर निषेध नोंदवत आहेत.
कुशल बद्रिकेचा प्राजक्ताला पाठिंबा
अभिनेता कुशल बद्रिके याने सोशल मीडियावर “जाहीर निषेध” लिहिलेला फोटो शेअर करत प्राजक्ताच्या समर्थनार्थ पोस्ट लिहिली. त्याने परळीतील आपल्या अनुभवांवर भाष्य करत म्हटलं, “प्राजक्ता, मी तुझ्या बरोबर आहे. कलाकारांचा सन्मान राखणे महत्त्वाचे आहे. प्राजक्ताच्या चारित्र्यावर झालेले आरोप निषेधार्ह आहेत.”
View this post on Instagram
विशाखा सुभेदारचा आक्रमक पवित्रा
अभिनेत्री विशाखा सुभेदार हिनेही फेसबुक पोस्टद्वारे प्राजक्ताला पाठिंबा दिला. तिने लिहिलं, “प्राजक्ता, मी तुझ्या पाठीशी आहे. विनाकारण दुसऱ्याचं नाव गोवणे ही माणुसकीला धरून नाही. मी या प्रकाराचा तीव्र निषेध करते.”
मुख्यमंत्री फडणवीसांची भेट आणि महिला आयोगात तक्रार
प्राजक्ता माळीने पत्रकार परिषदेत सांगितलं की, ती लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असून, या प्रकरणाची वस्तूस्थिती मांडून कठोर कारवाईची मागणी करणार आहे. तसेच, तिने महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली असल्याचंही स्पष्ट केलं.
करुणा मुंडेंच्या आरोपांवर प्राजक्ताचं उत्तर
करुणा मुंडेंच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना प्राजक्ता म्हणाली, “महिला म्हणून तुम्ही इतर महिलांच्या समस्यांचा विचार करू शकता. पुढे कोणतेही वक्तव्य करण्याआधी तपासणी कराल, अशी अपेक्षा आहे.”
या वादग्रस्त प्रकरणामुळे प्राजक्ता माळीला मराठी कलाविश्वातून मोठा पाठिंबा मिळत असून, या प्रकरणावर सर्व स्तरातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.