
मुंबईतल्या वाहतुकीच्या जाळ्यात आणखी एक महत्त्वाची भर पडणार आहे. मुंबई मेट्रोच्या यलो लाईन 2B, म्हणजेच एक्वा लाईन वर 16 एप्रिल 2025 पासून ट्रायल रन सुरू होत आहे. डायमंड गार्डन (चेंबूर) ते मंडाले (मानखुर्द) या पाच स्थानकांच्या 5.4 किलोमीटर लांबीच्या मार्गावर मेट्रोची चाचणी घेण्यात येणार आहे. विशेष बाब म्हणजे, भारतीय रेल्वेच्या १७२व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून ही चाचणी सुरू करण्यात येत आहे.
या मार्गावरील मेट्रो स्थानके:
डायमंड गार्डन (Chembur)
शिवाजी चौक
बीएसएनएल मेट्रो
मानखुर्द
मंडाले
या चाचणी दरम्यान मेट्रो गाडी ताशी ८० किमी वेगाने धावणार आहे. यामध्ये रोलिंग स्टॉक, सिग्नलिंग, ट्रॅक आणि इतर तांत्रिक एकात्मता चाचण्या केल्या जातील. नंतर लोडेड ट्रायल (प्रवासी वजनासह) पार पडणार आहे. ही चाचणी यशस्वी ठरल्यानंतर, मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त (CMRS) यांच्या अंतिम मंजुरीनंतर मार्ग प्रवाशांसाठी खुले करण्यात येईल.
मल्टी-मॉडल ट्रान्सपोर्टचा नवा अध्याय: मोनोरेल-मेट्रो जोडणी
या नव्या मार्गाची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे, चेंबूर येथे मेट्रो आणि मोनोरेल यांची थेट जोडणी केली जाणार आहे. यामुळे प्रवाशांना एकाच ठिकाणी ट्रान्सफर करता येणार असून, त्यांना सुलभ, वेळबचत करणारा आणि आरामदायक प्रवास मिळणार आहे. हे मल्टी-मॉडल ट्रान्सपोर्टचे उत्तम उदाहरण ठरणार आहे.
गर्दीच्या वेळात, खासकरून शालेय, ऑफिस किंवा हॉस्पिटल प्रवासासाठी, ही मेट्रो लाईन एक वरदान ठरेल. तसेच उन्हाळ्यात गारेगार एसी मेट्रोतून प्रवास करण्याची सोय आता या भागातील नागरिकांना मिळणार आहे.
१०,९८६ कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प
हा प्रकल्प १०,९८६ कोटी रुपयांचा असून, सुरुवातीला २०१९ मध्ये पूर्ण होण्याचे नियोजन होते. मात्र तांत्रिक आणि यंत्रणात्मक अडचणींमुळे विलंब झाला. आता, डिसेंबर २०२५ पर्यंत संपूर्ण मेट्रो 2B मार्ग कार्यान्वित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मेट्रो 3 प्रकल्पही अंतिम टप्प्यात – भुयारी मेट्रोचे स्वप्न जवळ
मुंबईतील पहिली भुयारी मेट्रो – मेट्रो लाईन 3 (कुलाबा-वांद्रे-सीप्झ) चाही वेगाने विकास सुरू आहे. हा मार्ग ३३.५ किलोमीटर लांबीचा असून यामध्ये २७ भूमिगत स्टेशन आहेत. यामुळे वांद्रे ते चर्चगेट आणि दक्षिण मुंबई दरम्यानची प्रवासी गर्दी कमी होईल.
या मार्गाचा पहिला टप्पा ७ ऑक्टोबर २०२४ पासून सुरू झाला आहे. प्रवासी प्रतिसाद वाढत असला तरी संपूर्ण मार्ग सुरू झाल्यावर मेट्रोने प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल, असा अंदाज आहे.
नव्या मुंबईची वाटचाल – वेगवान, सुसज्ज आणि पर्यावरणस्नेही प्रवास
मुंबई मेट्रो प्रकल्प फक्त प्रवासाचा पर्याय नाही, तर तो शहरी जीवनशैलीत सकारात्मक बदल घडवणारा मोठा पायरी आहे. ट्रॅफिक, प्रदूषण आणि वेळेचा अपव्यय कमी करून, मेट्रोमुळे नागरिकांचा दैनंदिन प्रवास अधिक सोपा, वेगवान आणि आरामदायक होणार आहे.