
नागपूरच्या अष्टविनायकनगर येथे एक संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. सासू-सासऱ्यांनी आपल्या सुनेला विजेचा शॉक देत तिची निर्घृण मारहाण केली. पीडित महिलेचे नाव प्रीती असून, तिला शॉक दिल्यानंतर घरात पायऱ्यांवरून ओढत नेले गेले आणि लाथाबुक्क्यांनी तिच्यावर हल्ला करण्यात आला. या अमानुष प्रकारात तिचा चेहरा विद्रूप झाला असून, गंभीर अवस्थेत तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. “सासरा आहे की राक्षस?” अशा संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. पोलिसांनी सासू-सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
या घटनेमुळे पुन्हा एकदा महिला अत्याचाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अनेक महिला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र नसल्यामुळे त्यांना छळ सहन करावा लागतो, ही सामाजिक शोकांतिका आजही कायम आहे.