
औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू झालेल्या वादामुळे नागपुरातील महाल परिसरात मंगळवारी रात्री मोठा हिंसाचार उसळला. दोन गट आमने-सामने आल्याने तुफान दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली. यावेळी पोलिसांवर हल्ला करण्यात आला, ज्यामध्ये दोन जण जखमी झाले. वाढत्या तणावामुळे पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठा बंदोबस्त तैनात केला असून, संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. तसेच, अनेक संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे. सध्या नागपुरात तणावपूर्ण शांतता असून, पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहे.
दरम्यान, नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देत नागरिकांना संयम बाळगण्याचे आवाहन केले. त्यांनी व्हिडिओद्वारे सांगितले, “काही अफवांमुळे नागपुरात धार्मिक तणाव निर्माण झाला आहे. नागपूरने शांततेचा इतिहास जपला आहे आणि ही परंपरा कायम ठेवली पाहिजे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, रस्त्यावर उतरू नये. कायदा सुव्यवस्था राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्यांनी गैरकृत्ये केली असतील, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.”
नागपूरच्या नागरिकांना विनम्र आवाहन. pic.twitter.com/2jcCv4AaVN
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) March 17, 2025
नेमकं काय घडलं?
- औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू असलेल्या वादात महाल परिसरात दोन गट भिडले, त्यामुळे तणाव वाढला.
- अफवांमुळे संतप्त जमावाने पोलिसांवर दगडफेक केली, ज्यामध्ये दोन जण जखमी झाले.
- समाजकंटकांनी रस्त्यावर वाहनांची तोडफोड केली, ई-रिक्षा आणि ऑटो उलटवून वाहतूक अडवली.
- दुचाकींसह अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले.
- परिस्थिती हाताळण्यासाठी पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
सध्या शहरात शांतता राखण्यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असून, प्रशासनाने नागरिकांना संयम राखण्याचे आवाहन केले आहे.