
पुणे – दोन दिवसांपूर्वी सात महिन्यांची गर्भवती तनिषा भिसे हिचा मृत्यू झाल्यानंतर, तिच्या कुटुंबीयांनी गंभीर आरोप करत सांगितले की, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने पैशाअभावी उपचार नाकारले. या प्रकारानंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने मात्र हे आरोप फेटाळले असून, आतंर्गत चौकशी सुरू केल्याची माहिती दिली आहे. या चौकशीत रुग्णालयाने उपचार प्रक्रिया आणि घेतलेल्या निर्णयांविषयी आपली बाजू मांडली आहे.
या घटनेबाबत विचारले असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. एका गर्भवती महिलेवर वेळेत उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू होणे ही असंवेदनशीलतेची लक्षणं आहेत. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल हे महाराष्ट्रातील प्रतिष्ठित रुग्णालय आहे, परंतु काही डॉक्टरांनी दाखल करून घेण्यास नकार दिला किंवा जास्तीचे पैसे मागितल्याचे आरोप अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहेत.”
रुग्णालय ताब्यात घेण्याच्या मागणीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका घेतली. “भावना वेगळ्या असतात आणि कायद्याची प्रक्रिया वेगळी. कोणतेही रुग्णालय थेट ताब्यात घेता येत नाही. मात्र, या प्रकरणात काही अनियमितता आढळल्यास धर्मादाय आयुक्तांमार्फत आवश्यक ती कारवाई केली जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकारची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी धर्मादाय सहआयुक्त, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
धर्मादाय सहआयुक्त, पुणे यांच्या अध्यक्षतेत या चौकशी…— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) April 4, 2025
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी चार सदस्यांची समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. धर्मादाय सहआयुक्त, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती कार्यरत राहणार आहे.
मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर यासंदर्भात पोस्ट करत ही माहिती देण्यात आली आहे.