
प्रसिद्ध कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर विडंबनात्मक गाणं रचलं. या गाण्यात शिंदे यांचं नाव घेतलं नव्हतं, मात्र “गद्दार” असा उल्लेख होता. गाण्यातील संदर्भ एकनाथ शिंदेंना लागू होत असल्याचे सांगत शिवसैनिक आक्रमक झाले, त्यामुळे या प्रकरणावर राजकीय वादंग निर्माण झाला आहे. आता कुणाल कामराची नवी पोस्ट चर्चेत आली आहे.
कुणाल कामराच्या गाण्यानंतर घडलेल्या घटना
कुणाल कामराच्या शोदरम्यान सादर केलेल्या गाण्यानंतर तो कार्यक्रम ज्या हॉटेलमध्ये झाला, त्या ठिकाणी तोडफोड करण्यात आली. यानंतर कामराच्या विरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कुणाल कामराचं वक्तव्य अयोग्य असल्याचे सांगत कारवाईचा इशारा दिला. विधानसभेतही हा मुद्दा चर्चिला गेला. याचवेळी ठाकरे गटाने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित करत कामराला पाठिंबा दिला. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष निर्माण झाला.
दरम्यान, पोलिसांनी कामराला दोनदा समन्स बजावले, मात्र तो चौकशीसाठी हजर राहिला नाही. या घडामोडीनंतर कुणाल कामराने एक नवीन पोस्ट लिहीत कलाकारांवरील दबावाबाबत भाष्य केले आहे.
काय आहे कुणाल कामराची पोस्ट?
“लोकशाही पद्धतीने कलाकाराची हत्या कशी करायची?” असे शीर्षक असलेल्या या पोस्टमध्ये तो म्हणतो:
- एवढा संताप व्यक्त करा की कलाकाराला जाहिराती आणि ब्रँड्स मिळणं कठीण जावं.
- निषेध वाढवा, जेणेकरून कलाकाराला कोणताही शो करण्याआधी अनेकदा विचार करावा लागेल.
- मोठ्या कार्यक्रम स्थळांवर दडपण आणा, जेणेकरून ते शो घेण्यास नकार देतील.
- संतापाला हिंसेचं रूप द्या, लहान स्टुडिओ आणि मंच देखील दहशतीमुळे बंद होतील.
- प्रेक्षकांवर समन्स काढा, म्हणजे स्टँड-अप शो हा क्राईम सीनसारखा वाटेल.
“हे काही प्लॅनिंग नाही, तर एक राजकीय हत्यार आहे ज्यामुळे कलाकाराची पद्धतशीर लोकशाही हत्या करता येते,” असेही त्याने म्हटले आहे.
How to kill an Artist “Democratically” pic.twitter.com/9ESc9MZfWr
— Kunal Kamra (@kunalkamra88) April 1, 2025
या प्रकरणावरून काय प्रतिक्रिया उमटतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कुणाल कामराने याआधी मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली होती, जिथे त्याला दिलासा देण्यात आला. तसेच, या संपूर्ण वादावर माफी मागण्यास तो तयार नसल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. या संदर्भातील त्याची पोस्ट देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.