
मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या विविध भागांमध्ये पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने मुंबईसह ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांमध्ये आजही पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. सध्या राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले असून, यामुळे कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाले आहे. परिणामी, तापमानात काहीशी घट होत आहे.
मुंबई परिसरात पावसाची शक्यता
मुंबईसह ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांत आज हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. तसेच, काही भागांत ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील. पश्चिमी प्रणालीच्या प्रभावामुळे या भागांत पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.
मुंबई आणि नवी मुंबईत हलक्या सरी
सोमवारी सायंकाळी बोरिवली, दहिसर, खोपोली भागांत हलक्या सरी कोसळल्या. तसेच, मंगळवारी पहाटे वाशी आणि आसपासच्या परिसरातही पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली.
पुढील ३६-४८ तासांत पावसाचा अंदाज
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील ३६ ते ४८ तासांत मुंबई आणि परिसरात पूर्वमोसमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळतील, तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
संपूर्ण दिवस ढगाळ वातावरण
मुंबईत पावसाची शक्यता असल्याने मंगळवारी संपूर्ण दिवस ढगाळ वातावरण राहील. त्यामुळे उष्णतेची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे, मात्र आर्द्रतेमुळे काही प्रमाणात उकाडा जाणवू शकतो.
महाराष्ट्रातील अन्य भागांतही पावसाची शक्यता
कोकणात १ ते ४ एप्रिलदरम्यान पूर्वमोसमी पाऊस सक्रिय राहण्याचा अंदाज आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळतील. तसेच, कोकणच्या दक्षिण किनारपट्टीवर सोसाट्याच्या वाऱ्यांची शक्यता आहे.
याशिवाय, धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, वर्धा आणि बुलढाणा जिल्ह्यांतही आगामी चार-पाच दिवस पावसाळी स्थिती राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
पूर्वमोसमी आणि मोसमी पावसातील फरक
पूर्वमोसमी पावसाच्या वेळी दिवसभर उष्णतेची तीव्रता जाणवते आणि अचानक पाऊस कोसळतो. याउलट, मोसमी पावसात आकाशात ढग दाटून येतात, ऊन-सावलीचा खेळ सुरू राहतो आणि मग संथ वार्यासह पाऊस पडतो.
पूर्वमोसमी पाऊस प्रामुख्याने उष्णतेमुळे तयार होणाऱ्या ढगांमुळे पडतो. गरम वाऱ्याच्या प्रवाहामुळे बाष्प साठते आणि पावसाच्या रूपात प्रकट होते. मोसमी पाऊस मात्र मोठ्या प्रमाणावर तयार होणाऱ्या ढगांमुळे आणि समांतर वाऱ्यांच्या प्रभावामुळे पडतो.
पूर्वमोसमी पाऊस गडगडाटी आणि तीव्र स्वरूपाचा असतो, तर मोसमी पाऊस शांत, संततधार स्वरूपाचा असतो.