
म्यानमार आणि थायलंडमध्ये आलेल्या भीषण भूकंपाने थरकाप उडवला आहे. म्यानमारमध्ये या शक्तिशाली भूकंपामुळे हजाराहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे, तर थायलंडमध्येही जीवितहानीची भीती व्यक्त होत आहे. याच दरम्यान, बँकॉकमध्ये घडलेली एक विलक्षण घटना सध्या सर्वांच्या काळजाला भिडतेय.
भूकंपाच्या धक्क्यांमुळे बँकॉकच्या पोलीस जनरल हॉस्पिटलमधील डॉक्टर्सना रुग्णांना तातडीने बाहेर हलवावे लागले. त्याच वेळी, एका महिलेस शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती सुरू होती. मात्र, भूकंपामुळे हॉस्पिटलची इमारत रिकामी करताना डॉक्टर्सनी वेळ न गमावता रस्त्यावरच ऑपरेशन सुरू ठेवले. रस्त्यावरच डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी महिलेला सुरक्षितपणे बाळाला जन्म देण्यास मदत केली.
रुग्णालयाचे प्रवक्ते पोलीस कर्नल सिरिकुल श्रीसांगा यांनी सांगितले की, डॉक्टर्स व कर्मचार्यांनी इमारतीच्या बाहेर रिंगण करत महिलेला आधार दिला आणि त्या कठीण प्रसंगी नवजात बाळाचे स्वागत केले.
हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओत स्ट्रेचरवर असलेल्या महिलेभोवती डॉक्टर व कर्मचारी मदत करत असल्याचे आणि रुग्णालयातील इतर रुग्णही बाहेर हलवले जात असल्याचे पाहायला मिळते.
Footage during the earthquake in #Bangkok a baby was born in the park 😭 Waht a story to tell ‘’ I was born during the earthquake ‘’ #แผ่นดินไหว #earthquake #myanmarearthquake #bangkokearthquake #ตึกถล่ม pic.twitter.com/7E0FdzfPEf
— Miia 🩵 (@i30199) March 28, 2025
थाय इन्क्वायररच्या माहितीनुसार, सुदैवाने आई आणि बाळ दोघांची प्रकृती स्थिर असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, शुक्रवारी दुपारी १२.५० च्या सुमारास म्यानमारमध्ये तब्बल ७.७ आणि ६.४ रिश्टर स्केलच्या दोन मोठ्या भूकंपांचे धक्के बसले. या हादऱ्यांमुळे अनेक ठिकाणी इमारती कोसळल्या असून, थायलंडच्या बँकॉकमध्ये आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला असून २६ जण जखमी आहेत. तसेच ४७ जण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.