
मुंबई : प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेवर विडंबनात्मक गाणे सादर केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी कामराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, शिवसैनिकांनी खारमधील युनिकॉन्टिनेंटल स्टुडिओमध्ये जाऊन तोडफोड केली.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
२३ मार्च रोजी मुरजी पटेल यांना एका शिवसेना कार्यकर्त्याने कुणाल कामराच्या स्टँडअप कॉमेडी शोची व्हिडीओ क्लिप पाठवली. या क्लिपमध्ये कामराने शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणारे गाणे गायले होते. या गाण्यात “ठाणे जिल्ह्यातील एक नेते” असा उल्लेख करून विडंबन करण्यात आले होते. यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये संताप निर्माण झाला.
मुरजी पटेल यांनी पोलिसांत दिली तक्रार
या प्रकारानंतर, शिवसेना (शिंदे गट) नेते मुरजी पटेल यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात कामराविरोधात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनुसार, या विडंबनात्मक गाण्यामुळे शिवसेना आणि त्यांच्या राजकीय प्रतिस्पर्धी पक्षांमध्ये व्देष निर्माण होत आहे. तसेच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नैतिक आचरणावर टीका करून त्यांची बदनामी करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
शिवसैनिकांची स्टुडिओमध्ये तोडफोड
या घटनेनंतर, संतप्त शिवसैनिकांनी खार येथील युनिकॉन्टिनेंटल स्टुडिओमध्ये जाऊन तोडफोड केली. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली. शिवसैनिकांनी कार्यक्रम बंद पाडला आणि नागरिकांना बाहेर काढले. त्याचबरोबर स्टुडिओतील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करून शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पोलिसांनी नेमकी काय कारवाई केली?
या तोडफोडीच्या प्रकरणी खार पोलिसांनी स्वतः तक्रार दाखल केली. या प्रकरणात शिवसेना नेते राहुल कनाल, कुणाल सरमळकर, अक्षय पनवेलकर, गोविंद पडी, राहुल तुरबाडकर आणि इतर १५ ते २० कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
कोणत्या कलमांअंतर्गत गुन्हा दाखल?
खार पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यात १३२, १८९(२), १८९(३), १९०, १९१(२), ३२४(५), ३२४(६), २२३, ३५१(२), ३५२, ३३३, ३७(१), १३५ या कलमांचा समावेश आहे.
तसेच पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले असून, सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. त्याचबरोबर याबाबत पुढील तपासही सुरू आहे.