
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं तयार करून ते आपल्या शोमध्ये सादर केलं. या प्रकारावरून मोठा वाद निर्माण झाला असून, शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. तसेच कुणाल कामरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संपूर्ण प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली असून, त्यांनी कुणाल कामराला माफी मागण्याची मागणी केली आहे. तसेच, स्वातंत्र्याचा स्वैराचार सहन केला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “स्टँडअप कॉमेडी करण्याचा अधिकार कोणालाही आहे, मात्र अपमान करण्याचा अधिकार नाही.” त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, महाराष्ट्रातील जनतेने २०२४ मध्ये कोण गद्दार आणि कोण खुद्दार आहे, हे ठरवलं आहे.
त्यांच्या मते, “हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची खरी विचारधारा कोण पुढे नेत आहे, हे जनता ओळखते. त्यामुळे अशा प्रकारे खालच्या स्तरावर जाऊन माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अपमान करणं चुकीचं आहे.”
कामराने माफी मागावी – फडणवीस
मुख्यमंत्री फडणवीस यांनी कुणाल कामराने संविधानाचा संदर्भ दिल्याबद्दलही प्रतिक्रिया दिली. “संविधानाने व्यक्तिस्वातंत्र्य दिलं असलं, तरी त्याचा गैरवापर करता येणार नाही. दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण करता येणार नाही,” असं ते म्हणाले. त्यामुळे “कुणाल कामराने माफी मागावी,” अशी मागणी त्यांनी केली.
“योग्य ती कायदेशीर कारवाई होईल” – फडणवीस
फडणवीस यांनी पुढे स्पष्ट केलं की, “कोणीही स्टँडअप कॉमेडीच्या नावाखाली एखाद्या नेत्याला गद्दार म्हणू शकत नाही.” बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्या लोकांवर जनतेनेच निकाल दिला आहे, असं ते म्हणाले.
“जर जाणूनबुजून कोणाचा अपमान करण्याचा प्रयत्न होत असेल, तर ते सहन केलं जाणार नाही. योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल,” असा इशाराही त्यांनी दिला.
कुणाल कामराने केलेल्या विडंबनावरून मोठा वाद निर्माण झाला असून, शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावर कठोर भूमिका घेतली असून, कामराने माफी मागावी आणि कायदेशीर कारवाई केली जाईल, असं स्पष्ट केलं आहे.