
मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पातील एकही जागा अदानी समूहाला दिलेली नाही, असे स्पष्ट करत गृहनिर्माण मंत्री आशीष शेलार यांनी विधानसभेत विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. हा प्रकल्प अपात्र झोपडीधारकांनाही मुंबईत घरे देणारा एकमेव प्रकल्प असल्याचे त्यांनी सांगितले.
धारावीतील एकूण ४३० एकरांपैकी ३७ टक्के जागा खेळ आणि मनोरंजनासाठी राखीव ठेवण्यात आली आहे. धारावी पुनर्विकास प्राधिकरण (डीआरपी) ही राज्य सरकारची कंपनी असून, धारावीच्या जमिनीचा मालक सरकारच आहे. धारावीची जमीन अदानी समूहाला दिली गेली असल्याचा दावा चुकीचा असून, त्यासंबंधी कोणताही अधिकृत सातबारा दाखवावा, असे आव्हान शेलार यांनी विरोधकांना दिले.
‘डीआरपी’ ही कंपनी पुनर्विकासाचे कंत्राटदार म्हणून काम करणार आहे. निविदेनुसार मिळणाऱ्या लाभांपैकी २० टक्के हिस्सा राज्य सरकारला मिळणार आहे. धारावीतील ५० टक्के जागा ही महापालिका, राज्य सरकार व केंद्र सरकारच्या मालकीची आहे. पात्र झोपडीधारकांना धारावीतच घरे दिली जाणार असून, अपात्र झोपडीधारकांना मुंबईत घरे मिळतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विरोधकांनी धारावी पुनर्विकासाबाबत जनतेत संभ्रम निर्माण करू नये, असेही त्यांनी सांगितले.