
महाराष्ट्र क्रांती संघटनेने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक निवेदन सादर करून झटका मटण विक्रीसाठी देण्यात येणाऱ्या मल्हार सर्टिफिकेटचा प्रस्ताव त्वरित रद्द करण्याची मागणी केली आहे. मंत्री नितेश राणे यांनी झटका मटण विक्रीसाठी मल्हार सर्टिफिकेट वाटप करण्याची घोषणा केली होती. परंतु, या घोषणेनंतर महाराष्ट्रातील बहुजन समाजात तीव्र असंतोष पसरला आहे.
मल्हार हे नाव महाराष्ट्रातील तमाम बहुजन समाजासाठी एक श्रद्धास्थान आहे, आणि मल्हार नाव वापरून देवाच्या नावाचा खेळ सुरु झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. यामुळे महाराष्ट्र क्रांती संघटनेचे प्रमुख पी. बी. दादा कोकरे यांच्या नेतृत्वाखाली संघटनेने याबाबत त्वरित लक्ष देण्याची मागणी केली आहे.
निवेदन देताना महाराष्ट्र क्रांती संघटनेचे इम्तियाज भाई शेख, सुनील भाऊ कमुर्ले, रशीद भाई अन्सारी, श्रीमंत तोरणे साहेब, सौ प्रज्वला इंगळे मॅडम, सावन भाऊ कांबळे, कैलास भाऊ जाधव, चंदू भाऊ हागे, राजू भाई तापी, लाला हागे साहेब, शांताराम मोरे साहेब आणि इतर अनेक समाज बंधू भगिनी उपस्थित होते.
संघटनेचे मान्यवर म्हणाले की, मल्हार नावाचा वापर करून झटका मटण विक्रीसाठी सर्टिफिकेट देणे हे बहुजन समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारे ठरते. त्यामुळे हा निर्णय त्वरित मागे घेण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
तसेच, यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संबंधित मंत्र्यांनी तातडीने लक्ष घालून योग्य निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा महाराष्ट्र क्रांती संघटनेने व्यक्त केली आहे.