
लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण ईश्वरीय आदेशाने आलो असल्याचं विधान केलं होतं. त्यावर मोठी चर्चा आणि विरोधकांकडून टीका झाली होती. त्याच पार्श्वभूमीवर आता भाजपाचे ओडिशातील खासदार प्रदीप पुरोहित यांनी लोकसभेत थेट मोदींना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुनर्जन्म असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या विधानावरून विरोधकांनी आणि नेटिझन्सनी संताप व्यक्त केला आहे.
लोकसभेत नेमकं काय घडलं?
भाजपा खासदार प्रदीप पुरोहित यांनी मंगळवारी लोकसभेत बोलताना एक संताचा दाखला देत सांगितलं की, “माझ्या बारगढ मतदारसंघात गिरीजा बाबा नावाचे संत आहेत. त्यांनी मला सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पूर्वजन्म छत्रपती शिवाजी महाराजांचा होता. त्यांचा दुसरा जन्म मोदींमध्ये झाला आहे आणि ते भारताला जगातील सर्वात शक्तिशाली राष्ट्र बनवण्यासाठी कार्यरत आहेत.”
अखंड हिंदुस्तानाचे आराध्य दैवत आणि रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारंवार अपमान करण्याचे आणि महाराष्ट्रातील तसेच जगभरातील शिवप्रेमींची अस्मिता दुखावण्याचे नियोजनबद्ध कारस्थान भाजपच्या नेतेमंडळींकडून केले जात आहे.
या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा मानाचा जिरेटोप… pic.twitter.com/N624xkfkQN
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) March 17, 2025
विरोधक आणि नेटिझन्सचा संताप
या विधानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. अनेकांनी मोदींची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करणे हा महाराजांचा अपमान असल्याचं म्हटलं आहे. विरोधकांनी या वक्तव्यावरून भाजपाला धारेवर धरलं असून, या विधानाबद्दल पक्षाने माफी मागावी, अशी मागणी केली जात आहे.
काँग्रेसचा जोरदार हल्लाबोल
काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी या विधानावर संताप व्यक्त करत भाजपावर टीका केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार अपमान करण्याचा भाजपाचा कट आहे. मोदी यांना शिवरायांशी तुलना करून महाराजांचा मोठा अपमान करण्यात आला आहे. महाराष्ट्र आणि संपूर्ण देशातील शिवप्रेमींच्या अस्मितेवर हा घाला आहे.”
सध्या सोशल मीडियावर या विधानावरून तीव्र पडसाद उमटत असून, लोकसभेतील हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे.