सामाजिक ऐक्य आणि राजकीय पर्याय या विषयावर यवतमाळ येथे दोन दिवसीय चिंतन शिबिराचे आयोजन करण्यात आले. देवांगण लॉन, जांब रोड येथे १५ व १६ मार्च २०२५ रोजी झालेल्या या शिबिराचे आयोजन लोकतांत्रिक राष्ट्र निर्माण अभियान महाराष्ट्र, भारतीय पिछडा शोषित संघटन नवी दिल्ली, ओबीसी जन मोर्चा, अनुसूचित जाती-जमाती संघटनांचा परिसंघ नवी दिल्ली, ओबीसी आरक्षण परिषद, कास्ट्राइक कर्मचारी महासंघ, विदर्भ राज्य आंदोलन समिती, आदर्श जनप्रतिनिधी निवड मंडळ आणि इतर सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.

शिबिराचे उद्घाटन परिवर्तनवादी विचारवंत व सुप्रसिद्ध लेखिका प्राध्यापक नूतनताई माळवी (वर्धा) यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी त्या म्हणाल्या, “सामाजिक ऐक्य व राजकीय परिवर्तनाची सुरुवात स्वतःपासून झाली पाहिजे. समाजाने एकत्र येऊन आपल्या हक्कांसाठी लढा दिला पाहिजे.”

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय पिछडा शोषित संघटनेचे राष्ट्रीय कार्यकारी सदस्य आणि महात्मा ज्योतिराव फुले सत्यशोधक विद्यापीठ, यवतमाळचे संचालक डॉ. ज्ञानेश्वर गोरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून एड. ज्ञानेन्द्र कुशवाह (राष्ट्रीय सहसंयोजक, लोकतांत्रिक राष्ट्र निर्माण अभियान), माजी शिक्षण मंत्री वसंतराव पुरके, ओबीसी आरक्षण परिषदेचे अध्यक्ष प्रदीप वादाफळे, माजी प्राचार्य व्ही. एन. कदम, तसेच वंचित बहुजन आघाडीचे संघटक मोहन राठोड उपस्थित होते.

या शिबिरात विदर्भ आणि मराठवाड्यातून ६० पेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. उपस्थितांचे संविधान देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमात सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थितीवर सखोल चर्चा करण्यात आली.

या चर्चेतील प्रमुख मुद्दे आणि निर्णय पुढीलप्रमाणे होते –

  1. विद्यमान राजकीय व्यवस्था भांडवली प्रवृत्तीला पोषक असून, सर्वसामान्य जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष करते. त्यामुळे सामाजिक व आर्थिक विषमता वाढत आहे.
  2. अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय आणि अल्पसंख्यांक समुदायांनी एकत्र येऊन राजकीय पुढाकार घ्यावा.
  3. लोकप्रतिनिधींची निवड आता पारंपरिक पक्षांवर विसंबून न राहता, जनतेने स्वतः निवडून देण्याचा निर्णय घ्यावा.
  4. यवतमाळ जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर जनप्रतिनिधी निवड मंडळ स्थापन करण्यात यावे.
  5. वंचित समाजातील जेष्ठ नागरिकांसाठी ‘सीनियर सिटीजन फोरम’ स्थापन करावे.
  6. युवकांसाठी ‘युथ फोरम’ ची स्थापना करून त्यांना नेतृत्वासाठी सक्षम करावे.

या चिंतन शिबिराचे प्रमुख संयोजक गोविंद चव्हाण (लोकतांत्रिक राष्ट्र निर्माण अभियान, महाराष्ट्र), एम. के. कोडापे, मनोहर शहारे, डॉ. विलास काळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आयोजन केले. तसेच या शिबिराचे सूत्रसंचालन डॉ. विलास काळे यांनी केले असून एम.के.कोडापे यांनी आभार व्यक्त केले.