
औरंगजेबच्या कबर हटवण्याच्या मागणीवरून विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने आंदोलन केल्यानंतर सोमवारी रात्री महाल परिसरात दोन गटांमध्ये तणाव वाढला. या संघर्षामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर दगडफेक, जाळपोळ आणि तोडफोड झाली. चार तासांहून अधिक काळ चाललेल्या या गोंधळानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधूर आणि लाठीचार्जचा वापर केला.
या घटनेनंतर नागपूर शहरातील संवेदनशील भागात तणाव निर्माण झाला. कोतवाली, गणेशपेठ, तहसील, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरानगर आणि कपिलनगर या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नागपूर पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांनी दिलेल्या आदेशानुसार, पुढील सूचना मिळेपर्यंत हे निर्बंध कायम राहतील. पोलिसांना प्रभावित भागातील रस्ते बंद करण्याचा आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी कठोर पावले उचलण्याचा अधिकार देण्यात आला आहे.
सोमवारी रात्री झालेल्या हिंसक घटनेत अनेक वाहनांची तोडफोड झाली, काहींना आग लावण्यात आली, तसेच दुकानांवर दगडफेक करण्यात आली. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिस्थिती हाताळण्यासाठी शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस दल तैनात करण्यात आले आहे.
पोलीस आयुक्तांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. पोलिसांकडून हिंसाचारात सहभागी असलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाणार असून, संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ अंतर्गत कारवाई करण्यात येईल.
सध्या परिस्थिती नियंत्रणात असून, नागपूर पोलिसांकडून गस्त वाढवण्यात आली आहे. नागरिकांनी कायदा हातात न घेता शांतता राखावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.