
बारावी बोर्डाच्या परीक्षा नुकत्याच संपल्या असून, विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या तणावातून काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, निकालाबद्दलची चिंता अद्याप त्यांच्या मनात होतीच. बोर्डाच्या परीक्षांमध्ये उत्तरपत्रिकांची काळजीपूर्वक तपासणी केली जाते, परंतु काही शिक्षकांच्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थी अडचणीत सापडत असल्याची धक्कादायक घटना समोर येत आहेत.
उत्तरपत्रिका जळाल्याची घटना
विरारमध्ये बारावी कॉमर्सच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी घरी नेणाऱ्या एका शिक्षिकेच्या घराला अचानक आग लागल्याने उत्तरपत्रिका जळून खाक झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे असंख्य विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले असून, पालक आणि विद्यार्थी संतप्त झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, विरार पश्चिम गंगुबाई अपार्टमेंट, बोलींज नानभाट रोड, आगाशी परिसरात राहणाऱ्या या शिक्षिकेने बारावीच्या उत्तरपत्रिका रीचेकिंगसाठी घरी आणल्या होत्या. सोफ्यावर ठेवलेल्या या उत्तरपत्रिका अचानक लागलेल्या आगीत जळून गेल्या. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे सांगितले जात आहे. घरातील इतर सामानाबरोबरच विद्यार्थ्यांचे पेपरही जळून खाक झाले.
शिक्षकांचा निष्काळजीपणा?
विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या उत्तरपत्रिका शिक्षकांनी घरी नेण्याची गरजच काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यासंदर्भात बोलींज पोलीस तपास करत असून, दोषींवर कारवाई होणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश सावंत यांनी स्पष्ट केले आहे.
बसमध्ये उत्तरपत्रिका तपासण्याचा प्रकार
अलीकडेच आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. एका शिक्षकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यामध्ये तो चक्क चालत्या बसमध्ये बारावीच्या उत्तरपत्रिका तपासत असल्याचे दिसून आले. या प्रकारामुळे शिक्षण व्यवस्थेतील ढिसाळपणा आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यासंबंधी हलगर्जीपणा कसा होत आहे, यावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात!
या घटनांमुळे विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले जात आहे. शिक्षण व्यवस्थेतील अशा हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात येत असल्याने प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची गरज आहे. दोषींवर कठोर कारवाई होऊन अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.