
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा राज्याचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा, आरोग्य, कृषी आणि समाजकल्याण क्षेत्रांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या. विशेषतः लाडकी बहीण योजनेसाठी ३६,००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
उद्धव ठाकरे यांची सरकारवर टीका
अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारच्या निवडणूक घोषणांची आठवण करून देत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
▶ “मारल्या होत्या थापा भारी…”
उद्धव ठाकरे म्हणाले, “आज आचार्य अत्रे असते तर त्यांनी म्हटले असते, गेल्या १० हजार वर्षांत इतका बोगस अर्थसंकल्प झाला नसेल. निवडणुकीच्या काळात वारेमाप जाहिराती करण्यात आल्या होत्या. आता सरकारचे घोषवाक्य असावे – ‘थापा मारायचं थांबणार नाही’!”
▶ लाडक्या बहिणींसाठी २१०० रुपये कुठे गेले?
ते पुढे म्हणाले, “महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी मोठमोठ्या जाहिराती केल्या, जनतेला आश्वासने दिली. पण सत्तेत आल्यानंतर एकही आश्वासन पूर्ण केले का? लाडक्या बहिणींना दरमहा ₹२१०० देण्याचे वचन पाळले का?” असा थेट सवाल ठाकरे यांनी केला.
छत्रपती संभाजी महाराज आणि अटल बिहारी वाजपेयी यांचे स्मारक
या अर्थसंकल्पात संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक आणि मुंबईत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त स्मारक उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच पुढील दहा वर्षांत पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी १ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.