
अमेरिकेत २७ वर्षीय भारतीय विद्यार्थी गम्पा प्रवीण कुमार याची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. ही घटना विस्कॉन्सिनमधील मिल्वॉकी येथे घडली. प्रवीण एका स्टोअरमध्ये पार्ट-टाइम काम करत असताना दरोडेखोरांनी हल्ला केला आणि गोळीबारात त्याचा मृत्यू झाला.
तेलंगणातील रहिवासी आणि डेटा सायन्सचा विद्यार्थी
प्रवीण कुमार हा तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यातील रहिवासी होता. त्याने डेटा सायन्समधून शिक्षण घेतले होते आणि उच्च शिक्षणासाठी विस्कॉन्सिन विद्यापीठात दाखल झाला होता. त्याचा अभ्यासक्रम पूर्ण होण्यासाठी अवघे चार महिने शिल्लक होते, पण त्याआधीच त्याची निर्घृण हत्या झाली.
वडिलांची हृदय पिळवटून टाकणारी प्रतिक्रिया
प्रवीणच्या वडिलांनी माध्यमांना सांगितले, “माझा मुलगा ऑगस्ट २०२३ मध्ये अमेरिकेला गेला. जानेवारीत तो भारतात आला होता आणि कोर्स पूर्ण करून अमेरिकेत स्थायिक होण्याचा त्याचा विचार होता. पण या क्रूर हल्ल्यात त्याचा जीव गेला. आम्ही आता कोणाकडे पाहायचं? पुढे काय करायचं काहीच सुचत नाही.”
मृत्यूच्या काही तास आधीचा कॉल
प्रवीणने बुधवारी पहाटे २.५० वाजता वडिलांना कॉल केला होता, पण तो उचलला गेला नाही. त्यानंतर त्याच्या मित्रांनी वडिलांना संपर्क केला आणि त्यांची मुलाची जन्मतारीख विचारली. सुरुवातीला हा फ्रॉड कॉल असावा, असे त्यांना वाटले. मात्र नंतर पोलिसांनी माहिती दिली की दरोडेखोरांच्या गोळीबारात प्रवीणचा मृत्यू झाला आहे.
विद्यापीठ आणि अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया
प्रवीणच्या मृत्यूनंतर त्याच्या विद्यापीठाने शोक व्यक्त केला आहे. “आम्ही प्रवीणच्या कुटुंबाच्या संपर्कात आहोत आणि आवश्यक ती मदत देत आहोत,” असे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या दुर्दैवी घटनेनंतर प्रवीणच्या आईवर जबरदस्त मानसिक आघात झाला असून त्या अत्यंत अस्वस्थ आहेत.
ही घटना भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा उपस्थित करत आहे.