गेल्या १२ दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेले उलथापालथीचे राजकीय नाट्य अखेर संपुष्टात आले आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक जागा जिंकून मुख्यमंत्रीपद आपल्याकडे ठेवणार असल्याचं स्पष्ट केलं होतं, परंतु महायुतीतील नेत्यांमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी वेळ लागला. दोन दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदावर शिक्कामोर्तब झालं आणि अजित पवार उपमुख्यमंत्री होणार असल्याची घोषणा झाली. मात्र, एकनाथ शिंदेंच्या भूमिकेबाबत संभ्रम कायम होता.
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदावर सहमत
आज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सायंकाळी साडेपाच वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. “शिवसेनेच्या सर्व आमदारांनी एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हावं, अशी विनंती केली होती. या विनंतीला मान देत त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे,” असं शिवसेना (शिंदे गट) आमदार उदय सामंत यांनी स्पष्ट केलं.
उदय सामंत पुढे म्हणाले, “एकनाथ शिंदे यांचं सरकारमध्ये असणं आम्हाला गरजेचं वाटत होतं. त्यांनी संघटन प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळण्याचा विचार केला होता, परंतु आम्ही त्यांना विनंती केली की ते सरकारमध्ये महत्त्वाची भूमिका निभवावीत. आज त्यांचं उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणं शिवसैनिकांसाठी अभिमानास्पद आहे.”
महत्त्वाच्या खात्यांवरून मतभेद?
“महत्त्वाच्या खात्यांच्या वाटपावरून कोणतेही मतभेद नाहीत. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, आणि केंद्रीय नेतृत्व योग्य निर्णय घेतील,” असंही सामंत यांनी सांगितलं.
या निर्णयामुळे महाराष्ट्रातील महायुती सरकार अधिक स्थिर होईल, असा विश्वास राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे.