अकलूज : माळशिरस विधानसभा मतदारसंघात (Malshiras Assembly Constituency) यंदा चुरशीची लढत पाहायला मिळाली. भाजपचे राम सातपुते यांनी मतमोजणीच्या १६व्या फेरीपर्यंत झुंज दिली. माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातून त्यांनी घेतलेल्या आघाडीमुळे उत्तम जानकरांसमोर अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र, १७व्या फेरीपासून पूर्व भागातील मोहिते-पाटील व उत्तम जानकरांच्या हक्काच्या गावांमधून जानकरांनी जोरदार मुसंडी मारली. यानंतर उत्तम जानकर यांनी १३,१४८ मताधिक्याने विजय मिळवला, तर राम सातपुते यांचा पराभव झाला.
राम सातपुतेंचे आरोप
राम सातपुते यांनी पराभव मान्य करताना आपल्या ट्विटद्वारे पक्षातील वरिष्ठांवरही गंभीर आरोप केले. “कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला. पण भाजपाच्या रणजितसिंह मोहिते पाटलांनीच भाजपविरोधात काम केले. पक्षाच्या पराभवासाठी त्यांनी पैसे वाटले, भाजप कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या, पोलिंग एजंटांवर दबाव आणला,” असा आरोप सातपुते यांनी केला. त्यांनी मोहिते-पाटलांची तात्काळ भाजपमधून हकालपट्टी करण्याची मागणीही केली आहे.
विजयाचे कारणे
- मोहिते-पाटील आणि जानकर यांची एकजूट: मतदारसंघात मोहिते-पाटलांनी जानकरांना जोरदार साथ दिली. त्यांच्या एकत्र येण्याचा परिणाम मतदारांवर दिसून आला.
- शरद पवार गटाचा प्रभाव: राष्ट्रवादीच्या गडात शरद पवार यांचा प्रभाव कायम राहिला, ज्यामुळे मतदार ‘तुतारी’ सोबत राहिले.
- बाहेरच्या उमेदवारावर आक्षेप: राम सातपुते हे दुसऱ्या जिल्ह्यातील असल्याचे प्रचारात हायलाइट करण्यात आले. याचा थोडाफार परिणाम झाला.
महायुतीचा पराभव
भाजप महायुती विरुद्ध राष्ट्रवादी महाविकास आघाडीमध्ये जोरदार लढत झाली. सातपुते यांनी पश्चिम भागातून आघाडी घेत झुंज दिली. मात्र, रणजितसिंह मोहिते-पाटलांचा अप्रत्यक्ष विरोध आणि अंतर्गत फाटाफूट यामुळे भाजपचा पराभव झाला, असे विश्लेषण करण्यात येत आहे.
राजकीय वातावरण तापले
सातपुते यांच्या आरोपांमुळे माळशिरसच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. रणजितसिंह मोहिते पाटलांवर केलेले आरोप आणि भाजपमधील अंतर्गत संघर्षामुळे पुढील राजकीय समीकरणे कशी आकार घेतील, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
माळशिरस विधानसभेत आपला निसटता पराभव झाला.
कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला.
भाजपा कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या, मारहाण झाली.
भाजपाने ज्या रणजितसिंह मोहिते पाटलांना आमदारकी दिली, साखर कारखान्याला आर्थिक बळ दिले ,संपूर्ण ताकद दिली त्या रणजितसिंह मोहिते पाटील यांनी पूर्ण… pic.twitter.com/CuvL4B689t— Ram Satpute (@RamVSatpute) November 24, 2024