
गोरेगाव येथील वाघेश्वरी मंदिराजवळील फिल्मसिटी मार्गावर, रत्नागिरी हॉटेल परिसरातील दुकानांना रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत आसपासच्या झोपड्या, गाळे आणि गोदामे भस्मसात झाली असून त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य सुरू केले. त्यांच्यासोबत पोलिस, अदानी व पालिका प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनीही मदतकार्य हाती घेतले. आगीचा वेग वाढत असल्याने स्थानिक नागरिकांनी सुरक्षित स्थळी आश्रय घेतला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अग्निशमन दलाने ७.०८ वाजता पहिला आणि ७.१५ वाजता दुसरा लेव्हलचा इशारा दिला. काही वेळातच आग झोपडपट्टी, गाळे व गोदामांमध्ये वेगाने पसरली.
घनधोर धुरामुळे आग विझवण्यात अग्निशमन दलाला अडचणी येत होत्या. आगीत विद्युत यंत्रणा, विजेच्या तारा, दुकानातील सामान, लाकडी वस्तू आणि इतर साहित्य जळून खाक झाले. अखेर, रात्री नऊच्या सुमारास अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.
दरम्यान, या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. संबंधित अधिकाऱ्यांकडून पुढील तपास सुरू आहे.