
मुंबईतील भायखळा येथे बी. ए. मार्गावरील न्यू ग्रेड इंस्टा मिलजवळील एका ५७ मजली सालसेट इमारतीच्या ४२ व्या मजल्यावर शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
रहिवाशांची सुरक्षितता आणि प्रशासनाची तत्परता
आगीचा धूर आणि वाढती तीव्रता पाहता इमारतीतील रहिवाशांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. या घटनेत सध्या कोणतीही जीवितहानी झालेली नाही, अशी माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे.
अग्निशमन दलाची तत्काळ कारवाई
आगीची तीव्रता पाहता अग्निशमन दलाने सकाळी १०:४२ वाजता पहिल्या स्तराचा अलर्ट जारी केला. अग्निशमन दलाचे जवान, पोलीस आणि महापालिका अधिकारी घटनास्थळी उपस्थित असून, त्यांचे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
अद्याप आगीचे कारण स्पष्ट नाही..
या आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र, शॉर्टसर्किट किंवा अन्य तांत्रिक कारणांमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तपासानंतरच याबाबत अधिकृत माहिती मिळणार आहे.
नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन
भायखळा परिसरात धुराचे लोट पसरले असून, नागरिकांनी शांतता राखावी आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.